Breaking News

‘एसएफआय’चे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


बीड, (प्रतिनिधी):- स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्यावतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ सोडवा. या मागणीसाठी आयटीआयपासून नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. 
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर जोरदार आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संस्थेतील निदेशक (शिक्षक) यांचे अतिरिक्त मतदान कामे कमी करण्याची मागणी यावेळी ‘एसएफआय’ ने केली आहे. शिक्षकांच्या अतिरिक्त मतदान प्रक्रियेतील कामांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून या कामांमुळे शिक्षकांना तासिका वेळेवर घेण्यास अडचण होत आहेत. म्हणून संस्थेतील विद्यार्थ्यांच्यावतीने या प्रश्नासह इतर महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी ‘एसएफआय’ने विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संस्थेतील शिक्षकांचे अतिरिक्त मतदान कामे कमी करा. संस्थेत स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, प्रात्यक्षिक साहित्य, मशिनरी आदी सुविधा उपलब्ध करा. ऑनलाईन परीक्षा पद्धती रद्द करा. स्टायपेंडमध्ये महागाईनुसार वाढ करून दरमहा त्याचे वाटप करा. शासकीय तसेच खाजगी संस्थेतील आयटीआय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू करा. सर्व ट्रेडच्या प्रश्नपत्रिका मराठीतून देण्यात याव्यात. या मागण्या ‘एसएफआय’ ने केल्या आहेत. या मोर्चाचे नेतृत्व ‘एसएफआय’ राज्याध्यक्ष मोहन जाधव, राज्य सहसचिव रोहिदास जाधव, जिल्हा उपाध्यक्ष लहु खारगे,दत्ता प्रभाळे, नागेश पाटील संघटनेचे आयटीआय युनिट अध्यक्ष रवि राठोड, जिल्हा कमिटी सदस्य रामेश्वर जाधव, विनोद राठोड, युवराज पवार आदींनी केले. या मोर्चात गणेश आहेर, कृष्णा पवार, गौरव कांबळे, अभिषेक साळुंके, सुरेश राठोड, शुभम जोगदंड, राजेंद्र जगताप, जिशान शेख यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते