Breaking News

एसटी बसचा भीषण अपघात नव्हे विभागप्रमुखांचा सराव!


शेवगाव प्रतिनिधी

येथील शासकीय विभागातील विभाग प्रमुखाच्या टेबलवरील फोन अचानक खणतात आणि शेवगावपासून पाच किलोमीटरवर भगूरच्या पुलावर दोन बसमध्ये भीषण अपघात झाल्याचे फोनवरून सांगत इकडे या, असे आदेश या अधिकाऱ्यांना मिळतो. त्यानुसार अधिकारी अपघातस्थळी जातात, गेल्यावर हा सराव असल्याचे कळते आणि सर्वांचा जीव भांड्यात पडतो. 

शेवगाव-अहमदनगर ही शेवगाववरून अहमदनगरकडे जाणारी बस {क्र. एम. एच. २० बी. एल. ४२५९ तसेच अमदनगरवरून येणारी पुणे-परभणी या दोन्ही बसेसचा शेवगाव-अहमदनगर मार्गावरील भगूर या गावाजवळील पुलावर समोरासमोर अपघात झाला. तशी बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. या घटनेविषयी शेवगाव तहसील कार्यालयातून इतर शासकीय कार्यालयांमध्ये फोन करण्यात आले. परंतु या अपघातात किती जखमी आहेत, हे मात्र अद्याप कोणालाही शेवटपर्यंत समजले नाही. अपघाताची माहिती मिळताच या पुलावर अगोदरच शेवगाव महसूल कार्यालयाचे अधिकारी व १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सायरन वाजवत उभी असते. ही सगळी रंगीत तालीम शेवगाव आपत्कालीन विभागाने पूर्वतयारीने केले. 

सर्व एसटी महामंडळाचे तसेच आरोग्य विभागाचे कृषी विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र ही आपत्कालीन विभागाची रंगीत तालीम असल्याचे कळल्यानंतर अनेकांचा जीव भांड्यात पडला. या आपत्कालीन विभागाच्या रंगीत तालीमीमध्ये एस. टी. शेवगाव आगार प्रमुख देवराज व्ही. डी. तातडीने घटनास्थळावर सहकाऱ्यांसह हजर झाले. संजय मार्तोंडकर हेसुद्धा पोलिस फौजफाट्यासह भगूर येथील पुलावर तातडीने हजर झाले. त्याचप्रमाणे कृषी विभागाचे अधिकारी अशोक साळी, नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक राजू इंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. एल. घुले हेही घटनास्थळी हजर झाले. मात्र हा संपूर्ण सराव पार पडल्यानंतर शेवगाव पंचायत समितीचे अधिकारी हे ‘वरातीमागून घोडे’ या उक्तीप्रमाणे नेहमीप्रमाण उशिरा हजर झाले. तर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे अधिकारी इकडे फिरकलेच नाहीत. त्याळे या विभागाच्या प्रमुखांना यावेळी रीतसर नोटीस बजावण्यात आली. या सरावासाठी शेवगावचे तहसीलदार विनोद भामरे, नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे गणेश हुलमुखे, संतोष गर्जे, तलाठी बाळासाहेब केदार आदी अधिकारी उपस्थित होते.

चौकट

‘गंगामाई’चा ‘दे धक्का’ बंब 

अहमदनगर जिल्हा आपत्कालीन विभागाने ९ ते १४ हा सप्ताह आपत्कालीन सप्ताह म्हणून साजरा करावा, असे आदेश जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयाने दिले आहेत. यानुसार हा सराव पार पडला. गंगामाई साखर कारखान्याचा अग्निशामक बंब या सरावादरम्यान उशिरा पोहोचला. मात्र हा अग्निशामक बंब ‘दे धक्का’ असल्याने तासभर अडखळला होता.