Breaking News

धारूर रस्त्यावरील अतिक्रमण काढले


धारूर, (प्रतिनिधी):- शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूच्या अतिक्रमणामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. यासंदर्भात वेळोवेळी अतिक्रमण काढण्यासंदर्भात तहसिलदाराकडे मागणी करण्यात आली होती. प्रामुख्याने सकळ मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सुशोभिकरणाला अडथळा निर्माण करणार्‍या अतिक्रमण काढण्याची मागणी अधिक तिव्रतेने होती. यासंदर्भात तहसिलदाराच्या आदेशाने धारूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अतिक्रमण राष्ट्रीय महामार्गाच्या कर्मचार्‍यांनी काढले असून यामुळे धारूरकरात समाधान व्यक्त होत आहे.
धारूर तालुका मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाच्या विळाख्यात सापडलेला आहे. शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूने पानटपरी, चहाचे स्टॉल सह विविध व्यवसायिकांनी आपले बस्तान मांडले होते. मोटारसायकल पार्किंग रस्त्यावरच केली जात होती. यामुळे येणार्‍या वाहनांना अडथळा निर्माण झाला होता. वेळोवेळी यासंदर्भात तहसिलदारांना निवेदन देण्यात आली होती. मात्र यावर कारवाई होत नव्हती. सकळ मराठा समाजाने यासंदर्भात तहसिलदार यांना निवेदन दिले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभित करण्यात आला परंतू अतिक्रमणामुळे सुशोभिकरण फक्त नावालाच होते. यासंदर्भात तहसिलदाराने अतिक्रमण धारकाविरूध्दात कठोर कारवाई करत तात्काळ परिसरातील अतिक्रमणे काढली आहेत. अतिक्रमण काढल्याने वाहन धारक तसेच सामान्य धारूरकरांनी समाधान व्यक्त केले आहे.