Breaking News

खाशाबा जाधव कुस्ती संकुलासाठी जागा वर्ग; जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांच्या उपस्थितीत गोळेश्वर ग्रामपंचायतीकडून घेतला प्रत्यक्ष ताबाकराड (प्रतिनिधी) : येथील ऑलिंम्पिक वीर पै. खाशाबा जाधव कुस्ती संकुलासाठी गोळेश्वर ग्रामपंचायतींकडून 95 गुंठे जागा देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार दि. 5 रोजी जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांच्या उपस्थितीत गोळेश्वर ग्रामपंचायतींकडून या जागेचा रितसर ताबा शासनाकडे देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, तालुका क्रीडा संकुल समितीचे सचिव राजेंद्र अजनूर, स्मारकाचे वास्तू विशारद सारंग बेलापूरे, मलकापूरचे मंडल अधिकारी जयराम बोडके, ग्रामविकास अधिकारी विकास जगताप, भुकरमापक डी. आर. शेटके, गोळेश्वरचे सरपंच राणी जाधव, उपसरपंच प्रवीण जाधव, सदस्य अभिजीत झिमरे, तलाठी प्रशांत कोळी व ग्रामस्थ उपस्थित होते.
तालुका क्रीडा संकुलाच्या वतीने स्व. पै. खाशाबा जाधव यांच्या स्मारक व कुस्ती संकुलाचा प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे. यासंदर्भात ऑगस्टमध्ये जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडून जागेसंबंधी आवश्यक पूर्तता करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सर्व पाहणीनुसार व कागदोपत्री जागेचा ताबा घेण्यात आल्याची माहिती नाईक यांनी दिली. 
खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी होणार्‍या कुस्ती संकुलामधून भविष्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील. यादृष्टीने शासन प्रयत्नशील राहणार असून त्यासाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. या ठिकाणी कुस्तीवीरांसाठी माती आणि मॅचच्या आखाड्यासोबत ठराविक मल्लांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवाय त्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. संकुलासाठी तीन आराखडे तयार करण्यात आले आहेत. पहील्या आराखड्यानुसार शासनाकडून 1 कोटी 57 लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे. यापैकी 1 कोटी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे वर्ग केले असून उर्वरित 57 लाख संकुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर शासनाकडून देण्यात येतील. हे क्रीडा संकुल तालुका क्रीडा संकुल अंतर्गत बाब असल्याने संकुलाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, उपाध्यक्ष तहसीलदार राजेश चव्हाण व अन्य सदस्य, पदाधिकार्‍यांच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.