Breaking News

धान्य घोटाळ्यातील सुत्रधार अजून मोकाट, पोलीसांच्या संपर्कात ; प्रशासन मात्र अनभिज्ञ


सुरगाणा तालुक्यासह जिल्ह्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार सुरुच

नाशिक /सुरगाणा/ विशेष प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यात दोन वर्षापुर्वी खळबळ उडवून देत तब्बल नऊ तहासीलदारांचे ऐतिहासिक निलंबन करण्यास कारणीभुत ठरलेल्या सार्वजनिक धान्य घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार ठक्कर नामक भामट्याला मुसक्या बांधण्यास अजून यश आले नसतांना सुरगाणा सारख्या आदीवासी भागासह जिल्हाभरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या भांडारात घोटाळ्याचे उंदीर नव्याने खेळू लागल्याची माहीती हाती आली आहे. दोन वर्षापुर्वीच्या या बहुचर्चीत घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार ग्रामिण पोलीस यंञणेच्या नित्य माहीती असूनही जिल्हा प्रशासनाला माञ त्याचे धागेदोरे मिळत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. मागचा घोटाळा अजून प्रशासनाच्या छाताडावर नाचत असतानाच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य माफियांनी धान्याचा काळाबाजार करण्यासाठी गुजरातवर लक्ष केंद्रीत केल्याची खळबळजनक माहीती हाती आली आहे.

गरिबांना अल्पदरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर योजना आखण्यात येतात. असे असले तरी शासकीय स्वस्त धान्य दुकानातून अयोग्य पद्धतीने वाटप होत असल्यामुळे गरीबांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. याशिवाय धान्य दुकानातील हे धान्य काळ्या बाजारात विकण्याचा गोरखधंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असूनही याकडे अन्न पुरवठा विभागाचे लक्ष गेलेले नाही.बीपीएलधारकांना जीवन जगण्यासाठी स्वस्त धान्याचा आधार मिळतो. मात्र अन्न पुरवठा विभागाचा गाफिलपणा तसेच काळ्या बाजारातील दलालांशी असलेले साटेलोटे यात गरिबांचा जीव गुदमरत आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना शासकीय गोदामातून धान्याची उचल करण्यापासून ते परमीट पास करण्यापर्यंत अन्न पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांकडून होत असलेले आर्थिक शोषण अंत्योदयधारकांच्या जीवावर उठले आहे. 

अन्न पुरवठा विभागाचे अन्न वाटपाचे नियोजन कोलमडल्यामुळे त्याचा फायदा स्वस्त धान्य दुकानदारांनी घेतला आहे. परमीट पास केल्यानंतर धान्य उचलले गेलेले ते धान्य शिधापत्रिकाधारकांना निश्‍चित प्रमाणात मिळते का? उचल केलेले धान्य स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहचते का? गोदामात शिल्लक साठा व वाटप साठा याची दर महिन्यात तपासणी केली जाते का, असे अनेक कळीचे मुद्दे सार्वजनिक वितरण प्रणालीच्या पारदर्शक हेतूवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत आहेत. शिधापञिका धारकाने धान्याची उचल दोन दिवसात पैशाअभावी उचल केली नाही तर धान्य दुकानदार धान्य संपले, असे सांगून धान्य वाटप बंद करतात.शासकीय गोदामातूनच खर्‍या अर्थाने धान्याची मोठ्या प्रमाणात अफरातफर होत असल्याचे यापूर्वी सुरगाणा तालुक्यात सर्वात मोठे रॅकेट उघडकीस आणले होते. सरपंच व दक्षता समितीच्या सदस्यांना विश्‍वासात घेत नाहीत.चौकशी केली तर साठा व वाटप यात ताळमेळ बसत नाही. यामुळेच स्वस्त धान्य दुकानदारांचे चांगलेच फावत आहे. हा सर्व प्रकार राजरोसपणे सुरू असूनही कारवाई होत नाही. गरीबांना केरोसीनची नितांत गरज असते. मात्र केरोसीन विक्रेते प्रवाशीवाहनांना जादा दराने केरोसीन विकत असल्याने गरजूंना शिधापत्रिका दाखवूनही केरोसीन स्टॉक संपले असल्याचे सांगितले जाते. 

गुजरात राज्यात धान्याची विल्हेवाट

येथील धान्य बाजार समिती दलालामार्फत पोहचते केले जाते. यासाठी काही अडते याचा फायदा घेतात. काही दलाल धान्याचे दर घटले किंवा वाढले तर वाझदा सुरत येथे पाठवून खुलेआम धान्याची अफरातफर करतात. यासंबंधी अनेकदा तक्रारी केल्यावर मुद्देमालासह धान्यही पकडले. मात्र अन्न पुरवठा विभागाने मौन पाडल्याने हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.