Breaking News

समाजाला सुसंस्कारीत करण्यासाठी खारीचा वाटा उचलणे आवश्यक : रणजितसिंग राजपूतबुलडाणा,(प्रतिनिधी): शब्दांनी युद्धही होतात आणि शब्दांनी सुसंस्कारही होतात, शब्दबद्ध झालेले महापुरूषांचे प्रेरणादायी विचार ग्रंथांमधून आपणास वाचावयास मिळतात. त्यासाठी ते आत्मसात करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पत्रकार रणजितसिंग राजपूत यांनी गर्दे वाचनालयाने दसर्‍यानिमित्त आयोजित केलेल्या ग्रंथपूजन व वाचनप्रेमींचे स्नेहमिलन या कार्यक्रमप्रसंगी काढले. कार्यक़्रमाच्या अध्यक्षस्थानी गर्दे वाचनालयाचे उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष गोकुल शर्मा हे हाते. याप्रसंगी व्यासपीठावर गर्दे वाचनालयाचे कार्यवाह तथा स्वीकृत नगरसेवक उदय देशपांडे आणि आशुतोष वाईकर हे उपस्थित होते. 

सुरूवातीला दिप प्रज्वलीत करून आणि सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पत्रकार श्री. रणजितसिंग राजपूत यांचे हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. प्रास्ताविक आणि मान्यवरांच्या परिचयानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचे लोणार सरोवर प्रतिमा व गुलाबपुष्प देऊन गर्दे वाचनालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. रणजितसिंग राजपूत आपल्या भाषणात म्हणाले की, आजचे युग हे डिजिटल युग आहे. मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून माहितीची सुविधा उपलब्ध झालेली असली तरीही सविस्तर मातीसाठी पुस्तकाचे वाचन सर्वोत्तम ठरते. वाचनातून चांगले गुण आत्मसात करणेही तेवढेच आवश्यक आहे. लागलेली आग विझविणार्‍यांच्या यादीत आपल्या नावाचा समावेश व्हावा यासाठी चिमुकली चिमणीसुद्धा तिच्या परीने प्रयत्न करते. तद्वतच समाजाला साक्षर करण्यासाठी साक्षरांना सुसंस्कारीत करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. उत्तम संस्कारासाठी काय वाचावे आणि काय वाचू नये याचप्रमाणे काय छापावे आणि काय छापू नये याची दक्षता मिडीयाने घेतली पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन ग्रंथपाल नेमीनाथ सातपुते यांनी तर सूत्रसंचालन श्री सचिन बल्लाळ यांनी केले. कार्यक्रमाला विजयराव जोशी, बाळ महाजन, डॉ.शरद भालेराव त्याचप्रमाणे वाचनालयाचे वाचक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.