Breaking News

भुजबळांना धमकी; राज्य कुणाचं?


विचार संपले, मुद्दे संपले, की लोक गुद्यावर येतात. या देशात अलिकडच्या काळात विचारांची लढाई विचारानं लढली जात नाही. वैचारिक ताकद राहिली नसल्यानं खून पाडण्यापर्यंत मजल गेली आहे. सर्वांनाच सर्वांचे विचार पटले पाहिजेत असं काही नसतं. एखाद्याचा विचार पटला नाही, तर तो साधार खोडून काढावा लागतो. तशी वैचारिक बैठक असावी लागते. तशी ती नसेल, तर शांत बसणं केव्हाही चांगलं; परंतु आता एखाद्याचे विचार पटले नाही, की त्यालाच या जगातून संपवून टाकलं जातं. आता हिंदुत्त्ववाद्यांतच असं प्रमाण वाढलं आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. एम. एस. कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्या झालेल्या हत्या एका विचारधारेच्या व्यक्तींकडून करण्यात आल्या आहेत. त्यांच्या हत्यांचं एक कनेक्शन आहे. आताही छगन भुजबळ यांना आलेली धमकी अशाच एका विचाराची आहे. केरळमध्ये परवा एका स्वामींच्या आश्रमावर झालेला हल्ला त्यांच्या पुरोगामित्त्वाविरोधात उचललेलं पाऊल होतं.

विचार संपले, मुद्दे संपले, की लोक गुद्यावर येतात. या देशात अलिकडच्या काळात विचारांची लढाई विचारानं लढली जात नाही. वैचारिक ताकद राहिली नसल्यानं खून पाडण्यापर्यंत मजल गेली आहे. सर्वांनाच सर्वांचे विचार पटले पाहिजेत असं काही नसतं. एखाद्याचा विचार पटला नाही, तर तो साधार खोडून काढावा लागतो. तशी वैचारिक बैठक असावी लागते. तशी ती नसेल, तर शांत बसणं केव्हाही चांगलं; परंतु आता एखाद्याचे विचार पटले नाही, की त्यालाच या जगातून संपवून टाकलं जातं. आता हिंदुत्त्ववाद्यांतच असं प्रमाण वाढलं आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. एम. एस. कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्या झालेल्या हत्या एका विचारधारेच्या व्यक्तींकडून करण्यात आल्या आहेत. त्यांच्या हत्यांचं एक कनेक्शन आहे. आताही छगन भुजबळ यांना आलेली धमकी अशाच एका विचाराची आहे. केरळमध्ये परवा एका स्वामींच्या आश्रमावर झालेला हल्ला त्यांच्या पुरोगामित्त्वाविरोधात उचललेलं पाऊल होतं. मनुस्मृतीनं महिला, दलितांना तसंच अन्य पिछड्या वर्गांना त्यांचे हक्क नाकारले होते. त्यामुळं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही मनुस्मृतीची होळी केली होती. मनुस्मृती हा काही पूजनीय ग्रंध नाही; परंतु आपल्या देशात मध्ययुगीन विचारांची अनेक माणसं आहेत. त्यांना मनुस्मृती हा अजून पवित्र ग्रंथ वाटतो. त्यांना इतर समाजाची प्रगती होऊ नये, असं वाटतं. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यांशी वैचारिक मतभेद असू शकतात; परंतु याचा अर्थ त्यांना धमकी देणं असा होत नाही. भुजबळ यांच्या अनेक भूमिका, त्यांच्या कृती, त्यांचं राजकारण सर्वांना पटेलच असं नाही. तशी अपेक्षाही धरता येणार नाही; परंतु याचा अर्थ भुजबळ यांना राज्यघटनेनं दिलेले अधिकार कोणालाही नाकारता येणार नाही.

भुजबळ यांचा राजकीय प्रवास कसा झाला, त्यांनी वैचारिक द्रोह केला, की नाही, हे वेगळे मुद्दे झाले; परंतु इतर मागासवर्गीयांसाठीचा त्यांचा लढा आणि त्यांनी त्याचं देशपातऴीवर केलेलं नेतृत्त्व कुणालाही नाकारता येणार नाही. मनुस्मृती ग्रंथ, संभाजी भिडे यांच्याविरोधात बोलले तर पानसरे, दाभोलकर यांच्याप्रमाणं तुमची हत्या करण्यात येईल’, असं धमकीचं पत्र भुजबळ यांना पाठविण्यात आलं. अर्थात अशा धमक्यांना भुजबळ भीक घालणारे नक्कीच नाहीत. त्यांचा आक्रमक स्वभाव पाहता त्यांनी दिलेलं उत्तर त्यांच्या स्वभावाला अनुसरूनच आहे. आतापर्यंत अशा प्रकारची अनेक पत्रं प्राप्त झाली. अशा धमक्यांना मी घाबरत नाही. आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या विचारावर चालणार्‍या समाजाचे चक्र उलटे फिरवणार्‍या मनुस्मृतीचं दहन करणारच,’ असा इशारा त्यांनी दिला आहे. देशाची राज्यघटना मनुस्मृतीपेक्षा मोठी आहे. इथला कारभार मनुस्मृतीनुसार चालत नाही, हे आता सनातन्यांनी समजून घ्यायला हवं. डॉ. आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दलित, वंचित घटकांना समता, न्याय दिला. आरक्षण देऊन त्यांना पुढं आणण्याचा प्रयत्न केला. अशी परिस्थिती असताना दिल्लीमध्ये काही लोक संविधान जाळतात, त्यांना मात्र अटक होत नाही. दुसरीकडं राज्यामध्ये मनुस्मृतीचं दहन करणार्‍यांना अटक केली जाते. 

ज्ञानेश्‍वरी, तुकारामांच्या ग्रंथापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ असल्याचं संभाजी भिडे सांगतात. भिडे यांचं खरं नाव मनोहर भिडे असून बहुजन समाजाला फसवण्यासाठी संभाजी असं नाव ते लावतात. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या विचाराला विरोध करणार्‍या विरोधात आम्ही कधीही शांत बसणार नाही. अनेकदा आमचं तोंड बंद करण्याचे प्रयत्न करण्यात आले. अडीच वर्ष तुरुंगात डांबले; मात्र अशा प्रवृत्तींना आमचा कायम विरोध असेल,’ असा भुजबळांनी दिलेला इशारा योग्य असाच आहे. भुजबळ यांना धमकीचं पत्र मिळताच राष्ट्रवादीचे माजी आमदार जयवंत जाधव यांच्यासह शिष्टमंडळानं पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करुन सुरक्षेची मागणी केली. या निवेदनाला धमकीच्या पत्राची प्रतही जोडण्यात आली. भुजबळांच्या सभांना मोठी गर्दी होत असताना अशा धमकीनं त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. गृहविभागानं त्याची दखल घेवून संबंधितांवर कारवाई करावी’, अशी मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या नगरसेवक किरण गामणे-दराडे यांनीही पोलिस आयुक्तालयात तक्रार दाखल करुन भुजबळ कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली. भुजबळ केवळ एका पक्षाचे नेते नसून ते नाशिकचे नेते असल्याचं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे. यावरून भुजबळाच्या बाबतीत पक्षीय भिंती केव्हाच गळून पडल्या आहेत. पूर्वीही भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे यांनी इतर मागासवर्गीय समाजाचे एकत्र मेळावे घेतले होतेच. भुजबळ यांना ठार मारणाच्या धमकीचं तीन पानी पत्र आलं आहे. या तीन पानी पत्रात शिवराळ भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्यावरूनच पत्र पाठविणार्‍याची लायकी कळते. पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी या प्रकरणी तपास सुरू केल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, भिडे यांच्या शिव प्रतिष्ठान हिंदुस्थाननं निनावी पत्राकडं लक्ष देऊ नये असं म्हटलं असलं, तरी हे पत्र नेमकं कोणी पाठविलं, त्यामागं भिडे यांच्याव्यतिरिक्त अन्य कुणी आहे का, याचा शोध घ्यायला हवा. सनातनसारख्या संस्था अशा प्रकारचं कृत्य करू शकतात. पत्र पाठविणार्‍याचा उद्देश काय आहे, हे शोधणं हे पोलिसांचं काम असलं, तरी यानिमित्तानं पुरोगामी व्यक्तीचं जीवन सुरक्षित नाही, देश सनातन्यांच्या हातात आहे, हे लक्षात येतं.