Breaking News

व्याजाचे पैसे न दिल्याने शेतकर्‍याला पाजले विष सावकाराला अटक करण्याची मागणी


बीड : सावकाराच्या व्याजाचे पैसे वेळेत परत न केल्याने संबंधित सावकारांनी शेतकर्‍याला बळजबरीने विष पाजल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये संबंधित शेतकर्‍याचा मृत्यू झाला, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनाला विरोध केला. जोपर्यंत संबंधित सावकारांच्या विरोधात गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर उशिराने जागे झालेल्या तलवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. भानुदास गेना शिंदे (वय-40 रा. तलवाडा), असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. या घटनेबाबत मृताच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी, की तलवाडा येथील सावकार बबन श्रीराम हात्ते, रोशन विठ्ठल हात्ते, गणेश विक्रम शिंदे, बाळू श्रीराम हात्ते, भरत सुभाष शिंदे, रमेश विक्रम शिंदे (सर्व रा. तलवाडा) यांनी भानुदास गेना शिंदे यांना विषारी औषध पाजून त्यांची हत्या केली. आरोपीविरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आरोपींनी  भानुदास गेना शिंदे या शेतकर्‍याला 50 हजार रुपये व्याजाने दिले होते. ठरल्या वेळेत भानुदास शिंदे यांनी सावकाराला पैसे परत न केल्याने सावकारांनी त्यांच्याशी वाद घातला. अखेर मंगळवारी सकाळी भानुदास यांना शेतात घेवून जाऊन 4 ते 5 जणांनी बळजबरीने विष पाजल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. यामध्ये संबंधित शेतकर्‍याचा मृत्यू झाला. याबाबत तलवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गवळी यांना विचारले असता संबंधित प्रकरणात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भानुदास गेना शिंदे यांची एकूण 4 एकर जमीन आहे. सावकाराचे घेतलेले पैसे पीक निघाल्यावर देतो, असे त्यांनी सांगितले. तरीदेखील सावकाराने आत्ताच पैसे पाहिजे म्हणून तगादा लावला होता. 2 दिवसांपूर्वी मृत शेतकर्‍याची पत्नी रंजना शिंदे यांनादेखील आरोपींनी मारहाण केली होती. मृताचा मुलगा श्रीकांत भानुदास शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.