Breaking News

हवामान विभागाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी : परजणे


कोपरगाव श. प्रतिनिधी : 

यंदा पावसाळ्यातील हवामान विभागाचे सर्वच अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरिपाचे क्षेत्र पूर्णपणे वाया गेले. त्याचबरोबर रब्बी हंगामाच्याही आशा मावळल्या आहेत. त्यामुळे हवामान विभागाने नैतिक जबाबदारी स्वीकारून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी केली.

या संदर्भात हवामान विभागाच्या ठोकताळा व कामकाजाविषयी परजणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून माहिती दिली. यात म्हटले आहे, की यावर्षी हवामान खात्याचे आपत्कालीन अंदाज काही अंशी फोल ठरले आहेत. त्यातून शेतकऱ्यांना फारसा लाभ झालेला नाही. पावसाविषयीच्या दीर्घकालीन अंदाजात अचूकता साधण्यात मात्र या विभागाला यश आलेले नाही, ही बाब अतिशय चिंताजनक आहे. हवामान खात्याने वेळोवेळी जाहीर केलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन केले. सरकारनेदेखील यावर कोट्यवधी खर्च केले. असे असताना शेतकऱ्यांच्या भ्रमनिरास झाला. पावसाने प्रत्येकवेळी हुलकावणी दिल्याने कापूस, सोयाबीन, बाजरी, मका, मूग, कांदा आदी पिकांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. त्यामुळे हवामान विभागाने नुकसानीची जबाबदारी स्वीकारून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.