Breaking News

सातार्‍यात सोमवार ठरला आंदोलन डे; झोपडपट्टी सुरक्षा दलाचे धरणे आंदोलन तर आरपीआयचे निवेदन


सातारा : सोमवारी सातार्‍यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील विविध राजकीय संघटनेसह वैयक्तिक न्याय मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनाचा दिवस ठरला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने पुणे (कोंढवा) येथील पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची तडकाफडकी केलेल्या बदलीची चौकशी होणेबाबत तसेच भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली झोपडीधारकांचे शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियामानुकूल करण्यासाठी तसेच लोणंद येथील गणपत आनंदा पवार यांनी सार्वजनिक रस्त्याचे काम पूर्ववत सुरु करण्यासाठी याशिवाय सौ. प्रणाली सागर खरात यांनी लोणंद नगरपालिकेचे मुख्याधिकारी व नगरसेवक यांनी प्रभाग क्रमांक 10 मधील कामे जाणूनबुजून थांबवल्याप्रकरणी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पती व लहान बाळासह उपोषण सुरु केले आहे, दरम्यान, याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही देण्यात आले आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने जिल्हाध्यक्ष अशोक यांच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस मिलिंद गायकवाड हे आपल्या कर्तव्यामध्ये दक्ष असताना हडपसर विभागाचे आमदार योगेश टिळेकर यांच्याविरोधात कायदेशीर फिर्याद दाखल झाल्याने या फिर्यादीसंदर्भात आपले कर्तव्य बजावत असतानात्या संदर्भाचा गंभीर गुन्हा आमदार टिळेकर यांच्यावर करण्यात आला. त्यामुळे त्यांनी आपले सरकारमधील वजन वापरुन मिलिंद गायकवाड यांची तडकाफडकी बदली केली आहे. याबदलीने जनसामान्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मिलिंद गायकवाड यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्‍यास योग्य न्याय न मिळाल्यास रिपाइंच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी आप्पासाहेब तुपे, शुक्राचार्य भिसे, वैभव गायकवाड, प्रतिक गायकवाड, आदित्य गायकवाड, श्रीकांत निकाळजे उपस्थित होते.

दरम्यान, झोपडपट्टीवासियांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट व जिल्हाध्यक्ष शिवाजी भिसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी झोपडपट्टीधारकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. झोसुदसह दलित विकास आघाडी व कामगार सुरक्षा दलाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील नागरी भागात आवश्यक असलेल्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण नियमानुकूल करुन प्रत्येक झोपडपट्टीधारकास 500 स्न्वेअर फुटाचे मोफत घरकुल देवून त्यांचे राहणीमान उंचविण्यात यावे. तसेच नगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासियांना गलिच्छ वस्ती निमुर्लन कायद्यार्ंगत घोषित करुन भौतिक मुलभूत सुखसोई देण्यात याव्यात. लोणंद रेल्वे रुळानजीक असलेल्या झोपड्या हटविण्याच्या पूर्व सूचना देणार्‍या रेल्वे प्रशासनास स्थगिती देवून सुधारित शासन निर्णयानुसार पर्यायी भूखंड देवून पुनवर्सन करण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्त पुणे विभाग यांच्या आदेशानुसार कार्यवाही व्हावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
 
यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी भिसे, राज्यसंघटक अशोक खुडे, दिलीप कांबळे, मोहंमद शेख, दत्ता कांबळे, अशोक जाधव, सुनीता जाधव, प्रविण संकपाळ, सनी ननावरे, लक्ष्मण खुडे यांची भाषणे झाली.
खंडाळा न्यायालयाने सार्वजनिक रस्त्याचे काम पूर्ण करावे असा निकाल दिलेला असताना शिवाजी माने यांनी हे काम थांबवले असून हे काम तातडीने सुरु करावे यासाठी लोणंद येथील गणपत आनंदा पवार हे उपोषणास बसले आहेत. 

त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खंडाळा न्यायालयाने गट क्र. 51, 54, 57 सह इतर गटातील सार्वजनिक रस्त्याचा निकाल दिला आहे मात्र, शासन दरबारी वजन असलेले शिवाजी माने यांनी त्याचा गैरफायदा घेत सर्व्हिस रस्त्याचे काम अर्धवट ठेवले आहे परिणामी या रस्ताच्या वापर ग्रामस्थांना होत नाही. शिवाजी माने यांच्या पाठिशी बोलवता धनी कोण आहे याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
लोणंदच्या बौद्धवस्तीतील अंतर्गत गटार बांधकाम करावे यामागणीसाठी सौ. प्रणाली खरात यांनी पती व लहान बाळासह उपोषण सुरु केले आहे. त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायत लोणंद यांच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळूनही येथील बौद्धवस्तीत दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत एकही काम केलेली नाही. याबाबत सौ. खरात यांनी तक्रार केल्यानंतर या प्रभाग क्रमांकातील काही परिसराची स्वच्छता करण्यात आली. दरम्यान, सौ. खरात यांच्या घरासमोर गटार बांधून मिळावे अशीही मागणी त्यांनी केली होती. मात्र, या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. घरासमोरील गटाराचे काम तातडीने करण्यात यावे यामागणीसाठी सौ. प्रणाली खरात या पती व लहान बाळासह उपोषणास बसल्या आहेत.