Breaking News

करंजेत पवनचक्कीच्या विजेचा धक्क्याने एकाचा मृत्यू


मेढा (प्रतिनिधी) : जावली तालुक्यातील करंजे येथील मरिआईच्या मंदिरावरील झेंडा बदलण्यासाठी गेलेल्या भगवान ज्ञानेश्वर धनावडे (वय 59) यांना पवनचक्कीच्या 33 केव्ही विजेचा शॉक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अक्षय नामदेव करंजेकर (रा.मेढा) हा युवक जखमी झाला. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवरात्रीनिमित्त करंजे येथील मरिआई मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यानिमित्त देवळाची साफसफाई करण्यासाठी भगवान धनावडे व त्यांची पत्नी रंजना हे दोघेजण मंगळवारी सकाळी मंदिराजवळ साफसफाई करीत होते. मंदिराच्या भिंतीला लागून लोखंडी पाईपला झेंडा बांधण्यात आला होता तो खुप जुना झाल्याने पाईप बाजुला घेण्यासाठी भगवान धनावडे व अक्षय करंजेकर हे दोघेजण पाईप काढत होते.पंरतू वीजप्रवाह करणारी लाईन मंदिराला घासून असल्याने पाईपचा तोल नकळत वीजप्रवाह करणहर्‍या तारेने ओढून घेतला व धनावडे यांना जोरदार शॉक बसून ते मंदिराच्या व्हरांड्यात फेकले गेले व जागीच मृत्युमुखी पडले व अक्षय करंजेकर बाहेर फेकला गेला.अक्षय जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करणेत आले आहे. दरम्यान करंजे ग्रामस्थांनी संबधित पवनचक्की मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व मयताच्या कुटुंबियांना पवनचक्की मालकाकडून तातडीची मदत देण्यात यावी अन्यथा जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.