Breaking News

राज्य मंत्रीमंडळ विस्ताराला वेग; एकनाथ खडसेंची मंत्रिमंडळात वापसी ?


मुंबई : राज्यात मंत्रीमंडळाच्या विस्ताराने वगे घेतला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. फडणवीस सरकारचा राज्यातील एक वर्षांचा कालावधी शिल्लक राहिला आहे, तसेच काही महिन्यात होणार्‍या लोकसभा निवडणूकांना सामौरे जाण्यासाठी, पक्षामध्ये नवचैतन्य आणण्यासाठी, नाराज आमदारांना मंत्रीपद देऊन, पुढील निवडणूकांना सामौरे जाण्याची रणनिती भाजपची असणार आहे, त्यादृष्टीने मंत्रीमंडळ विस्ताराने वेग घेतला आहे. 

भाजपाचे संघटन महामंत्री रामलाल यांच्यासोबत फडणवीस आणि दानवे यांनी दिल्लीतील लीला पॅलेस या हॉटेलमध्ये प्रदीर्घ चर्चा केल्याचे समजते. या बैठकीत शिवसेनेबरोबर जागावाटप, एकनाथ खडसेंच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. जमीन गैरव्यवहाराबाबत झालेल्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंना आपलं मंत्रिपद सोडावं लागलं होतं. खडसे हे पक्षनेतृत्वाबदल नाराज असल्याचंही चित्र आहे. मंत्रिपद सोडल्यानंतर एकनाथ खडसे यांनी सातत्याने राज्य सरकारच्या विविध निर्णयांतील उणीवा दाखवत सरकारला घरचा आहेर दिला. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर खडसेंची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दुसरीकडे, या बैठकीत सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची नाराजी कमी करण्यासाठी काय करता येईल, याबाबतही उहापोह झाला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे फेरबदलात शिवसेनेच्याही वाट्याला काही मंत्रिपदं येतात का, हे पाहणं उत्सुकतेचं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत काल बैठक होणार होती. मात्र ही नियोजित बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे महामंत्री रामलाल यांनी मुख्यमंत्री आणि दानवे यांच्यासोबत मंत्रिमंडळाबाबत चर्चा केली. रामलाल या चर्चेचा तपशील अमित शहांना कळवतील आणि त्यानंतरच मंत्रिमंडळाबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल.