Breaking News

कर्मचारी वेतनात दिरंगाई; कारवाई करा: कास्ट्राइब


माजलगाव, (प्रतिनिधी)- जिल्हा परीषद अंतर्गत येणार्‍या सर्व कर्मचार्‍यांचे वेतन प्रत्येक महिन्याला उशीरा होत असल्याने कर्मचार्‍यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वेतनात दिरंगाई करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. महिन्याच्या एक तारखेलाच कर्मचारी,निवृत कर्मचारी यांचे वेतन अदा करण्याच्या सूचना, ग्रामविकास विभागाने परीपत्रकान्वये दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने ’बीम्स प्रणाली’ आहे. अनुदान अप्राप्त असेल तरीही उणे प्राधीकारपत्राव्दारे वेतन काढण्याची सोय असल्यामुळे मात्र, बीड जिल्हा परिषदेकडून सातत्याने वेतनात दिरंगाई होत अल्याचे दिसून येत आहे. कर्मचार्‍यांच्या बँका, सोसायट्या, पतसंस्था, गृहकर्ज यातील व्याजाची रक्कम वाढत आहे. अनेक अडचणींना कर्मचार्‍यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे.