Breaking News

भाजपच्या मंत्र्यावर महिला पत्रकारांचे अत्याचाराचे आरोप


मुंबई : ‘मी टू’चे वादळ देशभरात घोंघावत असून, हे वादळ केंद्रीय परराष्ट्र राज्य मंत्री एम जे अबकर यांच्यापर्यंत येऊन धडकले आहे. एम जे अकबर हे इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक असताना लैंगिक शोषण केल्याचे आरोप सहा महिला पत्रकारांनी केले आहेत. केंद्रीय मंत्र्यावर असे आरोप झाल्यानं आता याप्रकरणी राजकारणही तापू लागलं आहे. भाजपचे खासदार उदित राज अकबर यांच्या विरोधात आरोप करणार्‍या महिला 10 वर्ष गप्प का होत्या, असा प्रश्‍न विचारला जातो. तर काँग्रेसनं या प्रकरणी मंत्र्यांनी मौन बाळगून चालणार नाही, लवकरात लवकर स्पष्टीकरण देणे गरजेचं आहे असं म्हटलं आहे. माजी पत्रकार आणि संपादक राहिलेल्या अकबर यांच्यावर 6 महिलांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर अश्‍लिल वर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर हॉलिवूडसह संपूर्ण भारतात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर सोशल मीडियावर चशढेे मोहिमेची सुरुवात झाली. यानंतर अनेक महिला आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत बोलण्यासाठी समोर येत आहेत. पत्रकारीतेनंतर आता राजकीय क्षेत्रांमधूनही तक्रारी पुढे येत आहेत. या मोहिमेत अनेक मोठे चेहरे समोर येत आहेत. सोशल मीडियावर एका महिला पत्रकाराने खुलासा करत मुंबईतील एका हॉटेलमध्ये अकबर यांच्याशी झालेल्या भेटीबाबतचा अनुभव सांगितला आहे. अकबर हे हॉटेलच्या रुममध्ये मुलाखती घ्यायचे आणि दारु पिण्यासाठीही ऑफर करायचे. फोनवर बोलताना घाणेरड्या भाषेचा वापर, अश्‍लिल मॅसेज पाठवणे आणि असभ्य कमेंट करणे असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.
अकबर यांनी राजीनामा द्यावा : काँग्रेस
केंद्रीय विदेश राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. अकबर यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांनी या आरोपांवर समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. पत्रकार आणि केंद्रीय विदेश राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अकबर हे पत्रकारिता क्षेत्रात असताना त्यांनी लैंगिक छळ आणि असभ्य वर्तन केल्याचा आरोप सहा महिलांनी केला आहे.