Breaking News

अग्रलेख - हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपची ‘कोंंडी’

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सत्तेवर आलेली भारतीय जनता पार्टी (भाजपा) याच मुद्द्यावरून आता बॅकफुटवर जातांना दिसून येत आहे. भाजपाचा हिंदुत्वाचा मुद्दा इतर पक्ष हायजॅक करत भाजपाला शह देण्याचा प्रयत्न सुरू आहे. विजयादशमीनिमित्त संघाच्या मुख्यालयातील भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांनी राममंदिराच्या मुद्द्यावरून सुनावत, यासाठी संसदेत कायदा करावा, असे खडे बोल सुनावले. सरसंघचालकांच्या या विधानानंतर भाजपाच्या एकाही नेत्यांनी यासंबधी प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून देखील राममंदिराचा प्रश्‍न उपस्थित केला आहे. वास्तविक पाहता विकासाच्या मुद्द्यावर देशात चर्चा होण्याऐवजी राममंदिरावरच चर्चा झडतांना दिसून येत आहे. राममंदिराचा विषय न्यायप्रविष्ठ असल्यामुळे, न्यायालयाच्या निर्णयानंतरच पुढील कृती करणे शक्य आहे. मात्र राममंदिराचे राजकीय भांडवल करून, पुन्हा सत्तेवर येण्याचा मानस हिंदुत्ववादी पक्षांचा दिसून येत आहे. भाजपाने या विषयावर बोलण्याचे टाळले असले तरी, सरसंघचालकांनी या मुद्द्याला हात घालत, संघाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडलेला नाही, याची आठवण करून दिली. सन 1992 मध्ये कारसेवकांनी बाबरी पाडली, तेव्हा भाजपने हे कृत्य आपल्या कार्यकर्त्यांचे नव्हे,’ अशी पडती भूमिका  घेतली. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र, हे कृत्य आपल्या शिवसैनिकांनी केले’ अशी बिनधास्त उघड भूमिका घेतली होती. वास्तविक राममंदिराचा मुद्दा त्यावेळीच भाजपच्या हातातून निसटला होता, असे म्हटले पाहिजे. त्या घटनेला आता पाव शतक उलटून गेल्यावरही अयोध्येत राममंदिर उभे राहू शकलेले नाही.  सुरुवातीला भाजप आपल्याला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळाले तर राममंदिराची उभारणी करण्यात येईल,’ असा दावा करीत असे. आता लोकसभेत स्पष्ट बहूमत असल्यानंतर भाजप हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची भूमिका घेतांना दिसून येत आहे. 


त्यामुळे भाजपच्या हातून हिंदुत्वाचा मुद्दा सुटून चालला आहे. तर दुसरीकडे हा मुद्दा भाजपच्या हातून सुटू नये म्हणून संघाकडून भाजपचे कान टोचणे देखील सुरू आहे. ज्याप्रमाणे शिवसेना सत्तेत राहून भाजपवर टीका करतांना दिसतोय, तीच भूमिका सरसंघचालक पार पाडतांना दिसून येत आहे. सत्ताधारी म्हणून भाजप ज्या विषयावर भाष्य करू शकत नाही, त्या मुद्द्यावर संघाने भाष्य करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. राममंदिर आणि मी टू च्या चळवळीमुळे राफेल मुद्द्यापासून अनेक महत्वाचे मुद्दे बाजूला पडतांना दिसून येत आहे. देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहे, तर दुसरीकडे महागाई मोठया प्रमाणात वाढत आहे. अच्छे दिनांचा बोजवारा उडाला आहे. सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्‍नांवर चर्चा करण्याऐवजी, विकासाच्या मुद्दयावर सरकारला घेरण्याऐवजी हिंदुत्वाचे मुद्दे काढून भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपबरोबरच काँगे्रस देखील हिंदुत्वाची व्होट बँक कशी तयार करता येईल, यादृष्टीने काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील हिंदु देव-देवतांच्या मंदिराना भेटी देण्याचा सपाटा चालवला आहे. गुजरात निवडणुकीपासून त्यांनी देवदर्शनाचा सपाटा लावत कर्नाटकातील मंदिर आणि मठ अक्षरश: झाडून काढले, मानसरोवर यात्रा करून सोवळे, धोती आणि विविध हिंदू पेहरावा करण्यात त्यांनी धन्यता मानली. त्यामुळे सत्ताधारी असो की विरोधक यांच्याकडून विकासाचे राजकारण करण्याऐवजी हिंदुत्वाच्या मुद्दयावर भारतीय राजकारण फिरतांना दिसून येत आहे. त्यामुळे अच्छे दिनांचा वादा केव्हाच मागे पडला असून, आगामी निवडणूकांत भावनिक राजकारण आणि हिंदुत्वाचा अजेंडा मुख्य स्थानी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.