Breaking News

काळया फिती लावून शिक्षकांचे कामकाज


सिंदखेडराजा,(प्रतिनिधी): शिक्षकांसाठी जाचक ठरणारा वरिष्ठ वेतनश्रेणी संदर्भातील शासन निर्णय रद्द करण्याचे आश्‍वासन देऊन मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांनी घुमजाव केल्याने जवळपास सर्वच शिक्षक संघटनांच्या आवाहनानुसार 23 ऑक्टोबर रोजी सिंदखेडराजा तालुक्यातील बहुसंख्य शाळांमध्ये काळ्या फिती लावून शिक्षकांनी काम केले. बारा वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना एका विशिष्ट प्रशिक्षणानंतर वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होत असे. मात्र 2017 ला काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी मिळवणे अत्यंत किचकट व अवघड केल्या गेले आहे.

 यासंदर्भात विधानसभेच्या गत हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने मोर्चा नेण्यात आला होता. त्यावेळी तसेच त्यानंतरही राज्यातील जवळपास सर्वच शिक्षक संघटनांसोबत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांनी सदर जाचक शासन निर्णय रद्द करण्याचे वेळोवेळी कबूल केले आहे. मात्र सदर शासन निर्णयात कवडीचाही बदल करण्यात आलेला नसून तो जसाच्या तसाच ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील बारा वर्षे सेवा झालेले अनेक शिक्षक हे वरिष्ठ वेतनश्रेणी मिळण्यापासून वंचितच आहेत. या जाचक निर्णयाला आज वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत प्रशासकीय व्यवस्थेला कुंभकर्णी झोपेतून जागे करण्यासाठी तालुकाभरातील जि. प. तसेच खासगी संस्थांच्या शाळेतील शिक्षकांनी काळ्या फिती लावत काम केले.