Breaking News

सीताफळाच्या तंत्रज्ञानावर संशोधन होणे गरजेचे : डॉ. विश्वनाथा


राहुरी प्रतिनिधी

सध्या महाराष्ट्रात सीताफळाची लागवड १३ हजार हेक्टर क्षेत्रावर झालेली आहे. कोरडवाहू क्षेत्रात डाळिंब या पिकानंतर सीताफळ हे महत्वाचे पीक आहे. सीताफळ हे पीक काढणीस तयार झाल्यानंतर ते जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे सीताफळाच्या काढणीपश्चात तंत्रज्ञानावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी केले. 

अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण व संशोधन संघ, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सीताफळ कार्यशाळा आणि प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर पुण्याच्या महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खा. संजय धोत्रे, माजी उपाध्यक्ष विजयराव कोलते, संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण व संशोधन संघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी, कुलसचिव डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. श्रीमंत रणपिसे उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना प्रमुख पाहुणे संजय धोत्रे म्हणाले, डोंगरदर्‍यातील सीताफळासारखे पीक शेतामध्ये आल्यामुळे शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी फायद्याचे ठरु शकते. हे फळ चांगले असते, त्याचे आयुष्यमान कमी असते. मानवी आहारात सीताफळाचे महत्व आहे. त्याच्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म यावर अधिक संशोधन झाले पाहिजे.

याप्रसंगी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी सीताफळ संघाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख यांनी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. सीताफळ संघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सीताफळ संघातर्फे सीताफळावर पी. एच. डी.चे काम करणारे विद्यापीठातील विद्यार्थी कुणाल माहुरकर यांना शिष्यवृत्तीनिमित्त, ज्ञानदेव महानोर यांना शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल उद्योजक पुरस्कार तसेच उद्यानविद्या विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. विनायक जोशी यांना सीताफळातील उल्लेखनीय संशोधनाबद्दल संशोधक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी सीताफळ संघाने तयार केलेल्या सीताफळावरील पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेत उपस्थित असणार्‍या सीताफळ उत्पादक शेतकर्‍यांना दर्जेदार उत्पादनासाठी सीताफळाचे सिंचन व खत व्यवस्थापन, सीताफळाचे दर्जेदार उत्पादन, सीताफळ प्रक्रिया उद्योग संधी व भवितव्य, सीताफळाचे काढणी पश्चात तंत्रज्ञान व प्रक्रियायुक्त पदार्थ, सीताफळ बीजनिष्कासन यंत्राचा वापर, सीताफळ विषयी शासकीय योजना, सीताफळाचे विक्री व्यवस्थापन इ. विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी केले. कार्यशाळेसाठी सीताफळ संघाचे उपाध्यक्ष एकनाथ आगे, कोषाध्यक्ष मधुकर डेहनकर, जैन इरिगेशनचे जडे, विद्यापीठातील विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, महाराष्ट्रातून आलेले सीताफळ उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनिल बोंडे यांनी आभार मानले.