Breaking News

पुण्याला मोठी शैक्षणिक परंपरा : राष्ट्रपती


पुणे : पुण्याला मोठी शैक्षणिक परंपरा आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरू केली. न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक यांनी शैक्षणिक संस्था सुरू केल्या, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. सिम्बियोसिसतर्फे दिल्या गेलेल्या नऊ सुवर्ण पदकांपैकी 6 पदके मुलींना मिळाल्यांनंतर त्यांनी ज्ञानाला लैंगिक आणि भौगोलिक मर्यादा कधीच नसतात असे देखील सांगितले. 

सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या 15 व्या पदवीप्रदान सोहळ्यात राष्ट्रपती बोलत होते. या वेळी त्यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागर राव, शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते उपस्थित होते. यावेळी शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांना डी.लिट. पदवी प्रदान करण्यात आली. देशात 903 विद्यापीठे आणि 33 हजार 905 महाविद्यालये आहेत. विविध शैक्षणिक संस्था तसेच विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षणात अमुलाग्र बदल देखील होत आहेत तरी देखील देशात आजही जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा अभाव असल्याचे स्पष्ट प्रतिपादन देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.