Breaking News

तत्वांशी तडजोड नसल्यानेच ‘प्रवरा’ परिवाराचा उदय : विखे


प्रवरानगर प्रतिनिधी 

सामाजिक काम करतांना प्रत्येकाच्या सूचना विचारात घेऊन नाविन्याची मुहूर्तमेढ रोवरणाऱ्या ‘प्रवरे’ने तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. म्हणूनच एक वेगळी आत्मीयता असलेला प्रवरा परिवार निर्माण झाला, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले. 

प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, जिल्हाधिकारी डॉ. राहूल दिवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कॅनडास्थित सुप्रसिध्द पॅथालॉजिस्ट आणि कर्करोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत जानी यांना प्रवरा अभिमत विद्यापीठाच्यावतीने देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी एम. एम. पुलाटे, डॉ. भास्करराव खर्डे, राजेंद्र कुंकलोळ, मोनिका विखे, सुवर्णा विखे, पंजाबराव आहेर, युवराज नरवडे, अनिल विखे, लक्ष्मण बनसोडे, शाम धावणे आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एस. एस. महाजन, प्राचार्य डॉ. शिवपालन, दीपाली हांडे, डॉ. सोमसुंदरम आणि एन.एस. पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. २५ वर्षे अविरत सेवा केलेल्या ३२ शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनाही मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थी आणि वैद्यकीय क्षेत्रांमध्ये संशोधन करणाऱ्या या प्राध्यापकांनाही विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. 

यावेळी बोलतांना ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर म्हणाले, महात्मा फुले यांची कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणणारे पद्मश्री विखे आणि शंकरराव मोहिते यांच्यासारख्या दिगज्जांना भेटता आले नसले तरी पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या बरोबर सातत्याने विविध विषयावर चर्चा होत असे. काही निवडक शहरामध्ये वैद्यकीय हब निर्माण होत आहेत. मात्र ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यवस्थेचे आजही दारुण चित्र उभे असताना ‘प्रवरे’ने निर्माण केलेले वैद्यकीय सेवेचे चित्र आशादायी आहे. जीवन गौरवप्राप्त डॉ. प्रशांत जाणी, जिल्हाधिकारी डॉ. राहूल दिवेदी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रबंधक हेमंत पवार यांनी आभार मानले.