Breaking News

शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवावा : बाफना

राहुरी / प्रतिनिधी.

दिवाळीनंतर कांद्याच्या भावात वाढ होण्याचे संकेत असून शेतकरयांनी कांदा साठवून ठेवावा, अशी माहिती राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक सुरेश बाफना यांनी दिली.

ते म्हणाले, की यावर्षी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. मागच्या वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवल्याने त्या कांद्याचे चांगले पैसे झाले. यावर्षी शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता. देशाच्या गरजेपेक्षा जास्त साठा झाल्याने कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणावर गेल्या ३ ते ४ महिन्यापासून होत राहिली. त्यात अनेक शेतकऱ्यांचा कांदा ख़राब झाल्याने तो कांदा कवडीमोल भावात विकावा लागला. मागील वर्षी लाल कांद्याचे प्रचंड पैसे झाल्याने यावर्षी कर्नाटक, आंध्रात लागवड मोठ्या प्रमाणात झाली. महाराष्ट्रातही कांद्याची शेतकऱ्यांनी रोपे मोठ्या प्रमाणावर टाकली. परंतु यावेळी निसर्गाने पावसाला ओढ़ दिल्याने तसेच कर्नाटक आंध्रमधील कांद्याला उत्पादनाचा उतारा न राहिल्याने सदरचा कांदा दिवाळीपर्यंत संपेल. आगामी दोन तीन महिन्यात कांद्याचे भाव वाढण्याचे संकेत असले तरी देशात आगामी काळात होणाऱ्या लोकसभा तसेच ५ राज्याच्या निवडणुकीदरम्यान जर कांद्याचे भाव जास्तच वाढले तर या कमी-जास्त होणाऱ्या भावाची नाड़ी केंद्र सरकारच्या हातात असून सरकारचे धोरण त्यास कारणीभूत ठरू शकते. मात्र आज कांद्याच्या निर्यातीबाबत सरकारचे धोरण अनकूल आहे.