पोलिसांनी नागरिकांमध्ये आपली विश्वासार्हता वाढवावी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
औरंगाबाद :- लोकशाहीत संवादाला अतिशय महत्त्व असते. त्यावरुन आपल्याबद्दलची प्रतिमा तयार होते. पोलीस ठाण्यात गेल्यास आपणास संरक्षण मिळेल, न्याय मिळेल, गुन्हेगारांना शिक्षा होईल, असा विश्वास सामान्य नागरिकांमध्ये निर्माण करावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात औरंगाबाद जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबतची आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री डॉ.दीपक सावंत, विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी,विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद,पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह उपस्थित होते.

लोकांशी संवाद साधल्याने पोलिसांप्रती आत्मियता, आपल्याला पोलिसांकडून न्याय मिळेल हा विश्वास, समाजामध्ये व्यापक प्रमाणात दृढ होण्यास मदत होते. दाखल गुन्ह्यांतील दोषसिद्धीचे, गुन्हेगारांना योग्य शिक्षा होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी नागरिक, पोलीस तसेच पोलिसांच्या सरकारी वकिलांसोबतचा संवाद महत्त्वाचा घटक आहे. त्याचप्रमाणे शासन पोलिसांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. त्याबाबत अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना त्याची माहिती देऊन पोलीस विभागात एक सकारात्मक वातावरण कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्नशील रहावे, असे सांगून श्री.फडणवीस पुढे म्हणाले की,महिलांवरील अत्याचाऱ्याच्या गुन्ह्यांना नियंत्रित करण्यासाठी गुन्हेगार हा अनोळखी आहे की नातेवाईक, परिचयातील आहे या आणि इतर बाबींचे विश्लेषण योग्य पद्धतीने करावे. जेणेकरुन त्याद्वारे योग्य उपाययोजना करुन गुन्ह्यांवर प्रतिबंध घालता येईल. त्याचप्रमाणे दोषसिध्दीचे प्रमाण वाढून गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी सबळ पुरावे, साक्षीदार फितूर होण्याचे प्रमाण कमी करण्यावर प्रामुख्याने भर देण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी. तांत्रिक पुराव्याचा वापर करण्याचे प्रमाण वाढवावे, ज्यामध्ये पुरावा फितूर होण्याची शक्यता नसते. ऑनलाईन तक्रारी नोंदणीसाठी व्यापक प्रमाणात नागरिकांना जनजागृती करुन माहिती द्यावी. अधिक सतर्कतेने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहावे, गंभीर गुन्ह्यांप्रमाणे निगडीत मोबाईल, दुचाकी चोरी, घरफोडी या घटनांचा तपासही तत्परतेने करुन जनसामान्यांना न्याय द्यावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिल्या.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget