Breaking News

ओबीसी संवर्गाला पदोन्नतीत आरक्षण द्या : ओबीसी महासंघाची मागणी


 बुलडाणा,(प्रतिनिधी): सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षणासंदर्भात दिलेल्या निर्णयानुसार राज्य सरकार पदोन्नती आरक्षणाचा निर्णय घेऊ शकते असे सांगितले. त्यानुसार ओबीसी संवर्गालाही पदोन्नतीत आरक्षण लागू करण्यात यावे, अशी मागणी ओबीसी अधिकारी, कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद आहे की, भारतीय राज्यघटनेने ओबीसी संवर्गाला भारतीय राज्य घटनेचे कलम 340 अन्वये सर्व प्रकारचे संवैधानिक हक्क, अधिकार दिलेले आहेत. त्या अनुषंगाने मंडळ आयोगाची निर्मिती होऊन प्रवेशामध्ये आरक्षण मिळाले आहे. तथापि अद्यापही मंडळ आयोगाच्या इतर शिफारशींची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळेच ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. तथापि नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षणासंदर्भात दिलेल्या निर्णयानुसार राज्य सरकार पदोन्नती आरक्षणाचा निर्णय घेऊ शकत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे एससी, एसटी संवर्गासह ओबीसी संवर्गालाही पदोन्नतीत आरक्षण लागू करण्यात यावे व ओबीसी संवर्गाला न्याय हक्कापासून वंचित ठेवू नये, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर दिलीप टेकाळे, एन. येसकर, एस.पी. मुळे, पंजाबराव टेकाळे, सुनील जाधव, शिवाजी शेळके, डी.ए. शेळके, व्ही.एस. पालकर, आर. सरोदे यांच्या सह्या आहेत.