Breaking News

बुलडाणा अर्बन गरबा फेस्टिवलचा शानदार समारोप


बुलडाणा,(प्रतिनिधी): संगीत व गाण्यांच्या तालावर पारंपारिक वेशभुषेसह गरबा खेळण्यात तल्लीन झालेले स्पर्धक व कलावंत, तरुणाईला आलेले उधाण, कलारसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि ‘अंबे माता की जय’ चा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणा बीसीसीएन व बुलडाणा अर्बन परिवाराने आयोजित केलेल्या गरबा फेस्टिवलचा 17 ऑक्टोबर रोजी समारोप करण्यात आला. सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या गरबा दांडीयाच्या माध्यमातून संस्कृतीचे जतन व्हावे तसेच शहर व परिसरातील लहान मुले, मुली, युवक, युवती आणि महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने बीबसीसीएन व बुलडाणा अर्बन परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही नवरात्री उत्सवानिमित्त शारदा कॉन्व्हेंटच्या मैदानावर 10 ते 18 ऑक्टोबर दरम्यान गरबा फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले होते.

17 ऑक्टोबरला या फेस्टीवलचा समारोप करण्यात आला. यावेळी बक्षीस वितरण सोहळ्याला बुलडाणा अर्बन परिवराचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, संस्थेचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर, गरबा आयोजन समितीच्या अध्यक्षा सौ.कोमलताई झंवर, बीसीसीएनचे संचालक दिनेश अहेर, अ‍ॅड. जितेंद्र कोठारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गरबा खेळाणार्‍या बालगोपाल गट, लहान गट व मोठा गट अशा विविध गटातील स्पर्धकांना राधेश्याम चांडक व इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषीक व बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच गरबा महोत्सवाचे संचालन करणारे लालाभाई माधवाणी, चंद्रशेखर जोशी यांच्यासह नियंत्रक कार्यकर्ते, परिक्षक, गरबा महोत्सवाचे थेट प्रक्षेपण करणारे बीसीसीएनचे कर्मचारी यांचाही यावेळी राधेश्याम चांडक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन लालाभाई माधवाणी तर आभार प्रदर्शन जितेंद्र कोठारी यांनी केले. गरबा फेस्टिवलच्या यशस्वीतेसाठी गरबा महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. कोमलताई झंवर, बीसीसीएनचे संचालक सुधाकर अहेर तसेच बीसीसीएन व बुलडाणा अर्बन गरबा आयोजन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.