Breaking News

आगामी निवडणुकीत भाजपवाल्यांना जागा दाखवा : चव्हाण


पाथर्डी प्रतिनिधी

भाजप सरकारच्या काळात १५ हजार लोकांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या. आमच्या काळातही आत्महत्या झाल्या. पण त्यावेळी आम्ही त्वरित सरसकट कर्जमाफी करून तुम्हाला न्याय देण्याचे काम केले. आज तरुणांना नोकऱ्या नसून त्यांना वडा विकण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे २०१९ च्या आगामी निवडणुकीत भाजपवाल्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
पाथर्डी येथे झालेल्या जनसंघर्ष यात्रेत ते बोलत होते. ते म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीच्या मतदानाचा विचार केला असता भाजपाला ३० टक्के मतदान झाले आणि ७० टक्के मतदानाचे विविध पक्षांमध्ये विभाजन झाले. त्यामुळे भाजपा सत्तेत आले. मात्र यापुढे येणाऱ्या सर्व समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढविण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, जनसंघर्ष यात्रेतून गावागावात फिरत असताना काँग्रेसची लाट आल्याचा अनुभव आला आहे. काँग्रेसने संपूर्ण देश एक संघ ठेवण्याचे काम केले. भाजपच्या कोणत्या नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले, हे दाखवून द्यावे. काँग्रेसबद्दल जनतेच्या मनात आदराची भावना आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही. बेरोजगारी वाढली आहे. अर्थव्यवस्था मोडीत काढण्याचे काम या सरकारने केले आहे. काँग्रेसने केवळ एकाच परिपत्रकावर कर्जमाफी दिली. देशात साखर उपलब्ध असताना बाहेरून साखर आणण्याचे काम हे सरकार करत आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी दिल्लीच्या टीमची काय गरज काय? जिथे जो निवडून येईल, तिथे तो उमेदवार देण्याची भूमिका पक्षाने घ्यावी.

डॉ. सुजय विखे म्हणाले, काँग्रेस पक्षाला दक्षिणेमध्ये चांगला प्रतिसाद आहे. वरिष्ठ नेत्यांनी आघाडीचा धर्म पाळत दक्षिणेची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी, यासाठी पूर्ण ताकत लावावी. गेल्या पंधरा वर्षांपासून याठिकाणी सातत्याने आघाडीचा उमेदवार पराभूत होत आहे. भाजपचा उमेदवार विजयी होत आहे. त्या उमेदवाराला कुठल्याही गावाची माहिती नसताना आघाडीमध्ये कुरघोडीचे राजकारण करण्यासाठी सातत्याने जागा ठेवून पराभवाला जाण्याचे काम होत आहे. पंधरा वर्षांपासून नगर जिल्ह्यातील दक्षिणेतील जनतेसाठी आवाज उठविण्यासाठी कोणी राहिलं नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत ही जागा काँग्रेस पक्षाला घेऊन चांगला उमेदवार द्यावा. आगामी महिन्यांत दक्षिणेतून खासदार निवडून देण्याची जबाबदारी मी घेतो.

यावेळी आशिष दुवा, बी. एन. जी. संदीप, सचिन सावंत, इब्राहिम भाई, अण्णासाहेब म्हस्के, जयकुमार गोरे, शोभा बच्छाव, राजू वाघमारे, हेमलता पाटील, राजाराम पानगव्हाणे, दिलीप सानंद, विनायकराव देशमुख, प्रकाश सोनवणे, आ. डॉ. सुधीर तांबे, अण्णासाहेब शेलार, शालिनी विखे आदींसह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुजय विखे यांनी केले. बालाजी गाडे यांनी जनसंघर्ष यात्रेचे स्वरुप मांडले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अजय रक्ताटे, बंडू बोरुडे, मोहनराव पालवे, काशिनाथ लवांडे, संभाजी वाघ, विधिज्ञ प्रतीक खेडकर, नासिर शेख, लाला शेख, बबन सबलस, जुनेद पठाण तसेच शेवगाव पाथर्डी तालुक्यातील पदाधिकारी आदींनी पुढाकार घेतला. माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी आभार मानले.