Breaking News

कराड तालुक्यातील तलावात आढळला युवकाचा मृतदेह

कराड, दि. 8 (प्रतिनिधी) ः कराड तालुक्यातील राजमाची येथील तलावात कुणाल सोपान गुंजाळ (वय 18, रा. आडगाव रेपाळ, ता. येवला, जि. नाशिक) या युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधित कॉलेज युवकाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कुणाल गुंजाळ हा कराड तालुक्यातील राजमाची येथील मोकाशी फूड टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिकत होता. रविवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास वसतिगृहात हजेरी घेण्यात आली. त्यावेळी कुणाल गुंजाळ गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याचा कॉलेज परिसरात शोध घेण्यात आला. मात्र, तो कुठेही सापडला नाही. त्यानंतर त्याच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता त्याने फोन उचलला नाही. वसतिगृहात रुमवर फोन ठेवून तो बाहेर गेला होता. ’मी येथे सापडलो नाही तर तळ्यावर येऊन शोधा’ अशा प्रकारचा मेसेज कुणाल गुंजाळ यांने मोबाईल वर टाईप करून ठेवला होता. दरम्यान, कुणाल गुंजाळ बेपत्ता झाल्याची फिर्याद रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसात देण्यात आली होती. सोमवारी सकाळी त्याचा शोध सुरू केला असता दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राजमाची तलावामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.