Breaking News

पेशवाईला मातीत गाडण्याची ताकद भारिपमध्येच : सोनुने


शिर्डी प्रतिनिधी

भारिप बहुजन महासंघाचे काम जोमाने सुरू आहे. तरुणाईचा यात मोठा सहभाग आहे. बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व जनतेने स्वीकारले आहे. समाजाचे प्रश्न मांडून सोडविण्याचे काम बाळासाहेब करत आहेत. गद्दारी करणाऱ्या पक्षासोबत ते युती करत नाहीत. काही नेते शीघ्र कविता करण्यात मग्न आहेत. त्यांना समाजाचे काही घेणेदेणे नाही, ही मोठी शोकांतिका आहे. मात्र असे असले तरी पेशवाईला मातीत गाडण्याची ताकद भारिप बहुजन महासंघातच आहे, असे प्रखर मत भारिपचे प्रदेशअध्यक्ष अशोक सोनुने यांनी व्यक्त केले. 

भारिप बहुजन महासंघाच्यावतीने (उत्तर नगर) सिद्धसंकल्प लॉन्स, साकुरी ता. राहता मोठ्या दिमाखात संकल्प मेळावा पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. राज्यातील ४८ जागा आम्ही ताब्यात घेणार आहोत, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला. प्रदेश महासचिव अमित भुईगळ म्हणाले, की सोलापूर ओरंगाबाद येथील सभा पाहून विरोधी विचार करू लागले या देशात समाज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पेक्षा कोणी मोठे नाही. कोणापुढे लाचार होऊ नका. आ. हरिभाऊ भदे, डॉ. सुरेश शेळके, जि. प. अध्यक्ष शरद खरात यांचे यावेळी भाषण झाले. या मेळाव्यास अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, नेवासा, राहुरी, अकोला, राहता, कोपरगाव आदी ठिकाणाहून महिला आघाडी, विद्यार्थी उपस्थित होते. बहुजन समाजातील कार्यकर्ते, महिला व पुरुष मोठया संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते. या मेळाव्यात असंख्य कार्यकर्ते यांनी भारिपमध्ये प्रवेश केला.