Breaking News

राज्यात ऑनलाईन कापूस खरेदी होणार; तूर, धान तसेच सोयाबीन ऑनलाईन खरेदी


नागपूर : महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ आणि कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सी.सी.आय) मिळून राज्यात सुमारे 118 खरेदी केंद्रे सुरू करणार असून यावर्षीपासून तूर, धान तसेच सोयाबीन प्रमाणेच कापुस खरेदीही ऑनलाईन करण्यात येणार आहे. पणन महासंघ राज्यात सीसीआयचा सबएजंट म्हणून खरेदी करतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पणन महासंघाची राज्यात 60 तर सीसीआयची 58 अशी एकूण 118 केंद्रांवर खरेदी राहाणार आहे. सीसीआयची 58 पैकी 29 केंद्रे विदर्भात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

सध्या बाजारात 5600 रूपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. हमीभावापेक्षा दीडशे रूपये जास्त भाव मिळत असल्याने अजून खरेदी सुरू करण्यात आली असल्याचे एक कारण सांगितल्या जाते. पणन महासंघातर्फे हंगामाच्या सुरूवातीला निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाते. यावर्षीही खरेदीच्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र सीसीआयकडून खरेदी संदर्भात निर्णय न झाल्यामुळे पणन महासंघाची खरेदी थांबलेली असल्याचे बोलले जाते. ऑनलाईन कापुस खरेदीसाठी केंद्र सरकार आग्रही असल्याचे कारण सांगितल्या जात आहे. व्यापारी स्वत:चा माल शेतकर्‍यांच्या नावावर विकून हमीभावाचा फायदा घेत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी उघडकीस आले. त्यावर पायबंद बसावा म्हणून कापसाची ऑनलाईन खरेदीही सक्तीची करण्याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करीत असल्याचे समजते. 

एकेकाळी आठ, दहा लाख क्विंटलच्या वर कापुस खरेदी होणार्‍या पणन महासंघात एकाधिकार संपुष्टात आल्यानंतर खरेदी शून्य टक्क्यांवर आली आहे. 2008-09 मध्ये 167 लाख क्विंटल खरेदी करण्यात आली. त्या नंतर मधली तीन ते चार वर्षे खरेदीचा दुष्काळ होता. 2014-15 मध्ये परत 25.46 लाख क्विंटल कापुस खरेदी झाली. तर 2015-16 मध्ये अडीच लाख क्विंटल आणि मागील हंगामात 2017-18 मध्ये फक्त 2855 क्विंटल खरेदी झाली. पणन महासंघ आणि सीसीआयमध्ये तीन खरेदी केंद्रांवरून डेडलॉक निर्माण झाला होता. हा तिढा सुटला की नेमकी किती खरेदी केंद्रे सुरू करायची याचा निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.