Breaking News

आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमध्ये माणच्या आणखी एका दिग्दर्शकाचा लघुपट


सातारा (प्रतिनिधी) : सातारा कुकुडवाड, ता. माण येथील दिग्दर्शक जावेदखान मुलाणी यांनी दिग्दर्शन केलेला लघुपट सनई पुणे येथे होणार्‍या तिसर्‍या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवामध्ये दाखवला जाणार आहे. 106 देशांमधून आलेल्या लघुपटांच्या यादीत सनईने बाजी मारली आहे आणि माणदेशाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. पुणे येथे होणार्‍या तिसर्‍या आंतरराष्ट्रीय महोत्सवात चित्रपट दाखवला जाणार आहे.
सौ. सुरेखाताई आप्पाशेठ काळेल यांची निर्मिती असलेला हा ग्रामीण धाटणीचा लघुपट सनई परिक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या लघुपटाची कथा, पटकथा व संवाद जावेदखान मुलाणी यांची असून कला दिग्दर्शक म्हणून नवनाथ कुंभार यांचे कामही वाखाणण्याजोगे आहे. या लघुपटामध्ये डी. ए. भोसले, संदीप डांगे, संध्या केशे, ऋतुजा इनामदार, सुधीर पुकळे, अर्जुन काटकर, सचिन टिंगरे व बालकलाकार रोशनी जाधव यांनी भूमिका केल्या असून छायाचित्रण व संकलन नासिर हुसेन यांनी केले आहे. वैभवशेठ काटकर यांचे निर्मिती सहाय्य आहे. ग्रामीण भागात चित्रीकरण आणि ग्रामीण कलाकार व तंत्रज्ञांच्या साहाय्याने जावेदखान यांच्या टीमने ही बाजी मारली आहे. या लघुपटाच्या यशाबद्दल जावेदखान मुलाणी यांचे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे व ज्येष्ठ दिग्दर्शक कुमारसेन कारंडे व युवा दिग्दर्शक अविनाश काटकर यांनी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले.