Breaking News

माणसाने असे सत्कर्म करत जावे कि, तीच आपली ओळख बनावी: डॉ.विजय सूर्यवंशी


देवळा  : माणसाने असे सत्कर्म करत जावे कि, तीच आपली ओळख बनावी आणि स्वतः जगत असतांना इतरांसाठी जगून पहावे असा आशावाद येथील भूमिपुत्र तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी जागवला. शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट च्या वतीने रविवार (ता.२१) रोजी देवळा येथील अनाथ व निराधार मुलांना मदतनिधी वाटप व शिवकालीन मावळ्यांच्या वंशजांचा सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार डॉ.राहुल आहेर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना म्हणाले कि निश्चित ध्येय, तीव्र इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व मेहनतीची तयारी असेल तर प्रत्येकजण यशाचा मानकरी होऊ शकतो. काम करो ऐसा कि पहचान बन जाए और हर कदम ऐसा चलो कि निशाण बन जाएं या शब्दात त्यांनी संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.डी.के.आहेर यांनी केले. यावेळी अनाथ व निराधार मुलांना धनादेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी व प्रसिद्ध कवी संदीप जगताप यांना शिवनिश्चल पुरस्कार, शिंदेशाही पगडी व मानपत्र देत सन्मानित करण्यात आले.

आम्ही शिवकालीन मावळ्यांच्या रक्ताचे वंशज असलो तरी आपल्या सर्वांना शिवरायांच्या विचारांचे वारस व्हायचे आहे अशा शब्दात राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या माहेरचे वंशज शिवाजीराजे जाधव, बहिर्जी नाईक यांचे वंशज दादासाहेब नाईक, हंबीरराव मोहितेंचे वंशज जयाजीराव मोहिते, तानाजी मालुसरे यांच्या वंशज शीतल मालुसरे यांनी आपल्या मनोगतात विचार मांडले. या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी या कार्यक्रमाचा हेतू विषद करतांना सांगितले कि विद्यार्थी वर्ग व युवा पिढी सुसंस्कारित व्हावी, निराधारांना आधार मिळावा व शिवरायांचे विचार प्रत्येकाने अंगीकारावेत. असे कार्यक्रम मुलांचे प्रेरणास्त्रोत व्हावेत. कवी संदीप जगताप यांनी शाळेचे इनस्पेक्शन व शेतकरी यांच्या कविता सादर करून उपस्थितांना अंतर्मुख केले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, बाजार समितीचे माजी सभापती योगेश आहेर. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हंसराज वडघुले, नाशिकच्या नगरसेविका अश्विनी बोरस्ते, देवळा एज्युकेशन संस्थेच्या सुशीला आहेर, आयकर आयुक्त अविनाश भामरे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस  शिवशाहीर सुरेश जाधव व त्यांच्या सहकार्यांनी शाहिरी गीते व छत्रपती शिवरायांचा पोवाडा सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. सूत्रसंचालन पूनम गोसावी व ऋषिकेश गोसावी यांनी केले तर भगवान आहेर यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी महिलावर्गासह येथील व राज्यभरातील शिवनिश्चलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवनिश्चल कोअर कमिटीच्या स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

समाजातील जे अनाथ, निराधार व दुर्लक्षित ज्येष्ठ नागरिक असे वंचित घटक आहेत त्यांचे अश्रू पुसण्यासाठी व त्यांच्या जीवनात प्रकाश पेरण्यासाठी अर्थात अशा सर्वांची जबाबदारी घेण्यास मी तयार आहे अशी ग्वाही आमदार डॉ.राहुल आहेर यांनी दिली.

येथील शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट च्या वतीने आयोजित कार्यक्रमात अनाथ व निराधार मुलांना मदतनिधी वाटप केल्यानंतर त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, आमदार डॉ.राहुल आहेर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, शिवव्याख्याते यशवंत गोसावी, कवी संदीप जगताप, शिवरायांच्या मावळ्यांचे वंशज, इतर मान्यवर व शिवनिश्चलचे स्वयंसेवक.