Breaking News

राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत : पी. चिदंबरमनवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नसतील, असे विधान ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, काँग्रेसकडून पंतप्रधानपदासाठी अजून कोणाचेही नाव निश्‍चित करण्यात आलेले नाही. 

मुळात काँग्रेस पक्षाला अशाप्रकारे पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्‍चित करण्याची कोणतीही गरज नाही. कधीही पंतप्रधानपदासाठी चर्चेत नसलेले नेतेही काँग्रेसच्या काळात पंतप्रधान झाले आहेत, असे चिदंबरम यांनी म्हटले. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान होण्याची तयारी दाखवली होती. मात्र, सर्व पक्षांनी भाजपविरोधात एकत्र येणे, हीच आपली प्राथमिकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. आम्ही सहकारी पक्षांशी केलेल्या चर्चेअंती दोन निर्णय घेण्यात आले. सर्वप्रथम सगळ्यांनी एकत्र येऊन भाजपचा पराभव करायचा. त्यानंतर पंतप्रधान कोण होणार हे ठरवायचे. जर सहकारी पक्षांनी पंतप्रधानपदासाठी आपल्या नावाला पसंती दिली तर आपण पंतप्रधान बनण्यास तयार आहोत, असे राहुल यांनी सांगितले होते. 

आम्हाला भाजपला पराभूत करायचे आहे, आम्हाला अस सरकार स्थापन करायचे आहे जे सुधारणावादी असेल, व्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करेल, कर दहशतीला थारा देणार नाही, महिला आणि मुलाबाळांची सुरक्षा असेल, शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करेल. चिदंबरम यांनी या मुलाखतीमध्ये महाआघाडीचा पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. पंतप्रधान पदाचा निर्णय निवडणूक पार पडल्यानंतर सर्वांना एकत्र घेऊन विचारविनीमय करून उमेदवार निवडला जाईल असे त्यांनी नमूद केले. चिदंबरम यांनी गेल्या दोन दशकांमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या मतांमध्ये घसरण होऊन प्रादेशिक पक्ष मजबूत झाल्याचे मान्य केले. काँग्रेसकडून महाआघाडीचे प्रयत्न सुरू असतानाच भाजपकडून तो डाव हाणून पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.