Breaking News

महावितरणच्या नव्या योजनांमुळे शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावेल


मुंबई : सौर ऊर्जेद्वारे शेतकर्‍यांना दिवसाही मुबलक वीज उपलब्ध करून देणार्‍या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व कृषीपंपांना नवीन वीजजोडणीसह दर्जेदार वीजपुरवठा देणार्‍या उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) या महावितरणच्या नव्या योजनांमुळे राज्यातील शेतकर्‍यांचे जीवनमान निश्‍चित उंचावेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी यांनी दिली. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना, उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजना व विद्युत वाहनांकरीता उभारण्यात आलेल्या महावितरणच्या चार्जिंग स्टेशन्स या तीन नव्या योजनांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, सहकारमंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेद्वारे राज्यातील सुमारे 7 लाख 50 हजार शेतकर्‍यांना दिवसाही पुरेशी वीज मिळणार आहे. यासोबतच शेतकर्‍यांना स्वस्त दराने वीज उपलब्ध होणार असून उद्योगांवरील सबसीडीचा भार सुद्धा कमी होईल. मागील 4 वर्षांत महावितरणने ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी केलेल्या विविध प्रभावी उपाययोजनांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.