Breaking News

भारनियमनाविरुद्ध महावितरण कार्यालयात ठिय्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप


राहुरी ता. प्रतिनिधी

शहर व तालुक्यात अचानकपणे सुरु झालेल्या सव्वा नऊ तासांच्या भारनियमनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान भाजपा सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करत भारनियमन रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. 

याप्रसंगी बोलतांना नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे म्हणाले, राज्यसरकारने अचानकपणे ऐन सणा-सुदीच्या काळात भारनियमन सुरु केले आहे. यामुळे सर्वसामान्य जनता, व्यापारी, शेतकरी यांचे नियोजन कोलमडून विजेअभावी नुकसान सोसण्याची वेळ ‘अच्छे दिन’चे गाजर दाखविणा-या भाजप शासनामुळे आली आहे. गेंड्याची कातडे पांघरणारे हे शासन सर्वसामान्य जनतेच्या मुळावर आहे. आजचे आंदोलन हे भारनियमनाविरोधात आहे. अॉक्टोबरमध्ये या आधी कधीही भारनियमन सुरु नव्हते. कोळसा पुरवठा कमी असल्याचे कारण पुढे करत राज्यातील विज कपात केली जात आहे. देशातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवत येथील विज कापली. येत्या दोन ते तीन दिवसात भारनियमनाचा कालावधी कमी करावा किंवा आधी होती ती पुरेसी विज उपलब्ध करुन द्यावी. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन हाती घेऊ. या आंदोलनात व्यक्त झालेल्या भावना निश्चितपणे शासनापर्यंत पोहचविल्या जातील, असे आश्वासन महावितरण अभियंता धिरज गायकवाड यांनी दिले. आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करुन भाजपा सरकारच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धिरज पानसंबळ, शहराध्यक्ष राजेंद्र जाधव, विक्रम गाढे, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, बाळासाहेब उंडे, संतोष आघाव, मनोज चुत्तर आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.