Breaking News

जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती, आणेवारी मात्र ५० पैशापेक्षा अधिक


बीड,(प्रतिनिधी)ः- जिल्ह्यात संपूर्ण पावसाळ्यात केवळ २८ दिवसच पावसांने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असाताना, पिकांची नजरे आणेवारी मात्र, ५० पैश्यापेक्षा अधिक झाली आहे. प्रशासनाच्या या आणेवारीनुसार जिल्ह्यात केवळ ३३ टक्के पिकांचे नुकसाने झाले आहे. या आणेवारी मुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार असून, याकडे सत्ताधारी लोकप्रतिनिधी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. जिल्हा प्रशासनाने बुधवारी नजरी आणेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्यतील १४०४ गावांपैकी ७३० गावांमध्ये ५० पैश्यापेक्षा अधिकची आणेवारी आली असल्याचा अहवाल आहे. प्रशासनाने काढलेल्या पैसेवारी बाबत आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी टिका केली आहे. प्रशासनाने काढलेल्या पैसेवारीमध्ये दुरूस्ती करता येऊ शकते. सद्याची स्थिती लक्षात घेवून प्रशासनातील अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नजरी पैसेवारी काढावी असे, त्यांनी म्हटले आहे. सर्वाधिक ६० पैसे इतकी पैसेवारी बीड तालुक्यात आली आहे. तर, पाटोदा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ४५ पैसे इतक्या पैसेवारीची नोंद झाली आहे. ५० पैश्याहून अधिक पैसेवारी असलेल्या तालुक्यांमध्ये बीड (२३९ गावे -६० पैसे), आष्टी (१७७ गावे - ५३ पैसे), अंबाजोगाई (१०६ गावे - ५६ पैसे), केज (१३५ गावे - ५१.६२ पैसे), धारुर (७४ गावे - ५६ पैसे) अशी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे या भागात पीक विम्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.आजपर्यंत जिल्ह्यात केवळ ३३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. ती गेल्यावर्षी याच काळात ६६० मिमी इतकी होती. परतीच्या पावसानेही दडी मारली आहे. याचा मोठा फटका पिकांना बसला आहे. कापुस आणि सोयाबीन ही जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत. मात्र, पिकांच्या वाढच्या काळातच पावसाने ताण दिल्याने सोयाबीन आणि कापसाची वाढ झाली नाही. त्यात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात घट झाली.
 
जिल्ह्यातील लहान मोठया सिंचन प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा २ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे पाणी केवळ पिण्यासाठीच राखुन ठेवण्यात आले आहे. या कारणाने शेतकर्‍यांच्या रबीच्या पिकाची आशा मावळली आहे. अशा परिस्थीतीत दुष्काळ जाहिर करण्याची मागणी तीव्र होत असली, तरी प्रशासन मात्र, उदासीनच दिसत आहे.प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी हे नजरी अंदाज आहे. दुष्काळा संदर्भातचा अंतिम निर्णय अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतरच घेतला जातो. तसेच नवीन निकषाप्रमाणेच ३३ टक्केपेक्षा अधिक नूकसान झालेले असल्यास दुष्काळ जाहीर करता येतो. अशी माहिती बीड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशींनी दिली.