Breaking News

चंदनाचे झाड चंदन तस्करांनी कापुन नेल्याने; नागरिकांमध्ये तीव्र संताप

देवळा (वार्ताहर)  रात्रीच्या सुमारास विठेवाडी व भउर (ता देवळा)  शिवारातील आहेर वस्ती शिवारात  शिव नाल्यात अंदाजे १० ते १५ वर्षा पुर्वीचे परिपक्व  झालेले  १२ इंच रुंद व ३० फुट उंचीचे चंदनाचे झाड चंदन तस्करांनी  कापुन नेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून,   परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी की ,तालुक्यातील लोहोणेर - कळवण   रस्त्यावरील  विठेवाडी  येथिल शेतकरी दयाराम बोरसे यांच्या बांधावर  मोठे चंदनाचे होते . रात्री ते  झाड  चंदन तस्करांनी कापुन नेले असून,या चंदन चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा ,अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे . विठेवाडी परिसरातील शिवनाल्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बांधावर चंदनाची झाडे आहेत .ही झाडे मोठी असल्याचा फायदा या चोरांनी घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे .  सद्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून ,चंदन तस्करांनी आपला मोर्चा या भागात वळविला असल्याने पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी शेतकरी कुबेर जाधव ,दयाराम बोरसे,रणजित  पवार ,तात्याभाउ बोरसे,अमर जाधव,राजाराम बोरसे संजय पवार,दीपक पवार,आदी शेतकऱ्यांनी  केली आहे .