Breaking News

शहरात प्रथमच अतिक्रमणांवर मोठी कारवाई

जामखेड ता. प्रतिनिधी

शहरातील खर्डा चौक, तपनेश्वर रोड ते स्मशानभूमी रस्त्यासह बाजारतळावरील अतिक्रमणे आज दि. १० मोठ्या पोलीस बंदोबस्त काढण्यात आली. अतिक्रमण काढत असतांना भूमी अभिलेखांच्या अधिकाऱ्यांनी मोजमापात दुजाभाव केल्याचा अतिक्रमणधारकांनी आरोप केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील अतिक्रमणावर प्रथमच मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. 

खर्डा चौक ते तपनेश्वर रोड अमरधाम रस्त्याचे काम अतिक्रमणांसह अनेक विषयामुळे रखडले होते. सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या अमरधाम रस्त्याचे काम लवकर सुरु करण्यासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे व जिल्हाधिकारी यांच्याकडे नागरिकांसह सामाजिक संघटनांनी अनेक वेळा लेखी व तोंडी मागण्या केल्या होत्या. हा रस्ता १२ मीटर असून दोन्ही बाजूने गटार व फूटपाथ आहे. या रस्त्यावरील गटाराचे काम सुरू आहे. पालकमंत्री शिंदे यांनी या रस्त्यासाठी ४ कोटी २६ लाख इतका भरीव निधी मंजूर करून दिला आहे. मात्र वर्क ऑर्डर मिळूनही अतिक्रमणांमुळे संबधित ठेकेदाराला काही काळ काम करता आले नव्हते. गावकी व राजकीय भावकीमूळे या रस्त्याचे काम रखडले होते.

… आणि ध्वजारोहण आणि हुतात्मा स्तंभ झाले मोकळे 

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारया वीरांच्या स्मरणार्थ बाजारतळावर उभारलेला १९८० सालापासून अतिक्रमणांच्या विळख्यात पडलेले ध्वजारोहण स्तंभ व हुतात्मा स्तंभ आज मोकळे झाले आहे. अनेक वर्षांपासून स्वातंत्र्यसैनिक या मागणीसाठी शासन दरबारी प्रयत्न करत होते.