Breaking News

उराशी मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगा : वाकचौरे


कोल्हार : प्रतिनिधी

ग्रामीण विद्यार्थी स्पर्धेच्या युगात कोठेही मागे नाहीत. विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात आहोत, याचा बाऊ न करता सकारात्मक दृष्टीकोन बाळगून विविध क्षेत्रात यश संपादन केलेले आहे. प्रचंड इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास याच्या जोरावर आपण आपले ध्येय साध्य करू शकतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये भरपूर क्षमता आहे. त्यामुळे त्यांनी मनातील न्यूनगंड बाजूला ठेऊन उराशी मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून वाटचाल केल्यास यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी केले.

पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागाच्यावतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संपतराव वाळूंज होते. वाकचौरे यांनी स्पर्धा परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षा पद्धतीची माहिती देत सांगितले, की विद्यार्थी कोणत्याही शाखेची पदवी मिळविण्यासाठी जेवढे कष्ट घेतो, व जेवढ्या परीक्षा देतो, त्यापेक्षा कमी वेळात आणि फक्त तीन परीक्षा देऊन स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता येते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता स्वतः ओळखल्या पाहिजेत. जे ध्येय निश्चित करतील आणि स्पर्धेत

भाग घेतील, त्यांना यश नक्की मिळेल. दरम्यान, प्राचार्य डॉ. वाळूंज म्हणाले, स्पर्धापरिक्षेविषयी जागृति निर्माण व्हावी आणि

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी धडपड केली पाहिजे, पुढे आले पाहिजे. प्रारंभी डॉ. प्रवीण तुपे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी वेणुनाथ वरखड, डॉ. अर्चना विखे, डॉ. विजय खर्डे डॉ. भाऊसाहेब नवले, डॉ. सोपान डाळिंबे, प्रा. विनोद कडू, प्रा. कविता राऊत तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. प्रतिभा विखे यांनी केले. उपप्राचार्य अनिल लांडगे यांनी आभार मानले.