Breaking News

दुधाच्या दरात मोठी घसरण, लिटरमागे २ रुपयांची कपात, दूध उत्पादक नाराज


बीड,(प्रतिनिधी)ः- सरकारने दुधाचे दर प्रति लिटर २ रुपयांनी कमी केले आहे. यापूर्वी दूध उत्पादकांना २७ रूपये प्रति लिटर दर मिळत होता. मात्र, आता सरकारने हा दर २५ रुपये प्रति लिटर केला आहे. जिल्ह्यातील जवळपास ३५ हजार दूध उत्पादकांना याचा फटका बसला आहे. सरकारने दुधाचे भाव कमी केल्यामुळे दूध उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात २१ खासगी आणि सहकारी दूध संघ आहेत. शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. सव्वातीन ते साडेतीन लाख लिटर दुधाचे उत्पादन जिल्ह्यात होते. शेतकरी संघटनेने दूध दरवाढीसाठी आंदोलन केले होते. यानंतर सरकारने प्रति लिटर ५ रुपयांनी दरवाढ केली होती. मात्र, आता पुन्हा प्रति लिटर २ रुपये कमी केल्याने दूध उत्पादकांनी सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे जनावरांच्या चार्‍याचे भाव वाढले आहेत. पाऊस नसल्याने जनावरांना हिरवा चारा मिळत नाही. त्यामुळे शेतकरी १६०० ते १७०० प्रति टन उसाचा चारा विकत घेत आहेत. शिवाय परतीच्या पावसाने दगा दिल्याने आता रब्बीच्या पेरण्यादेखील झालेल्या नाहीत. शेतकरी संकटात सापडलेला असतानाच दुधाचे भाव २ रूपयांनी सरकारने कमी केले आहेत. एक कडब्याची पेंडी ३० ते ३५ रुपयाला विकत घ्यावी लागत आहे. चार्‍याचे भाव गगनाला भिडले असताना सरकारने दुधाचे भाव कमी केले आहे. हा शेतकर्‍यांवर अन्याय असल्याचे दूध उत्पादक गहिनीनाथ डोंगर म्हणाले. दुधाला प्रति लिटर ६० रुपये भाव देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.