Breaking News

माऊलींच्या कर्मभूमीत ‘ज्ञानेश्वरी’ची मिरवणूक उत्साहात


नेवासा प्रतिनिधी

‘इये मराठीचिये नगरी ब्रम्हविद्येचा सुकाळू करी’ मराठी भाषेची अशी समृद्धता दर्शविणाऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाला नुकतीच ७२८ वर्षे पूर्ण झाली. याबद्दल ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या माऊलीच्या नेवासे नगरीत ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती.

पुणे येथील श्री संत सेवा संघ यांच्यावतीने काढण्यात आलेल्या या शोभायात्रा मिरवणुकीचा प्रारंभ श्री मोहिनीराज मंदिरापासून करण्यात आला. या मिरवणुकीत संत सेवा मंडळाचे पुणे येथील मंगेश पडवळ, सोनाली पडवळ, कोल्हापूर येथील मनोज पवार, श्रीरामपूरचे स्वप्नील मुरूमकर, ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचे शिक्षक काकासाहेब काळे, अरुण मकासरे, सुधीर बोरकर, गंगाधर गारुळे, सुंदरबाई कन्या विद्यालयाच्या शिक्षिका संगिता हापसे, मीना डफळ, त्रिमूर्ती सैनिकी स्कूलचे अल्लाउद्दीन तडवी, असिफ शहा, विनायक कोळी, भास्कर देशमुख आदींसह ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, सुंदरबाई कन्या विद्यालय, हभप गहिनीनाथ आढाव यांच्या ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्थेचे बाल वारकरी सहभागी झाले होते. या शोभायात्रेचे नेवासा शहरात ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.

येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर मंदिराचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते माऊलीच्या ग्रंथ व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अभियंते नगरसेवक सुनील वाघ आणि कृषीतज्ञ एकनाथ भगत यांच्या हस्ते आरती करण्यात आली. प्रारंभी पत्रकार सुधीर चव्हाण यांनी प्रास्तविक केले. अभियंते वाघ यांनी ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी ही काही कालावधीनंतर संत एकनाथ महाराजांनी पैठण येथे शुद्ध केली. मूळ ज्ञानेश्वरीची तिथीचा उल्लेख संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आढळून न आल्याने संत एकनाथ महाराजांनी शुद्ध केलेल्या तिथीलाच ज्ञानेश्वरी जयंती साजरी करण्यात येते, असे संयोजक मंगेश पडवळ यांनी सांगितले. यावेळी पत्रकार रमेश शिंदे, विजय कु-हाडे, गोरख भराट, लक्ष्मीकांत जोशी, संदीप आढाव आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.