Breaking News

सेवा सहकारी संस्थेच्या गट सचिवाने केली साडेतीन लाखांची अफरातफर


शिरूर का, (प्रतिनिधी)- तालुक्यातील आर्वी येथील सेवा सहकारी संस्थेचा गट सचिव मारोती बाळासाहेब परझने याने कर्जवसुलीपोटी जमा झालेली ३ लाख ६१ हजार ४४३ रुपयांची रक्कम बँकेत जमा न करता परस्पर हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर त्याने बनावट रोजकीर्द आणि बोगस चलन केल्याचेही उघड झाल्याने लेखा परीक्षकाच्या फिर्यादीवरून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सहकारी संस्थांचे प्रमाणित लेखा परीक्षक काझी हते शामुद्दिन नवाबुद्दिन यांनी शिरूर का. तालुक्यातील आर्वी येथील सेवा सहकारी संस्थेचे २००९ ते २०१७ कालावधीचे लेखा परीक्षण केले आहे. त्यात त्यांना अनेक आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या. या संस्थेचा गट सचिव मारोती बाळासाहेब परझने (रा. खालापुरी, ता. शिरूर) याने संस्थेच्या सभासदांकडून जमा केलेली कर्जवसुलीची ३ लाख ६१ हजार ४४३ रुपयांची रक्कम वसुली रजिस्टर व किर्दीला जमा खर्च केलीच नाही. तसेच, ही रक्कम खालापुरी येथील डीसीसी बँकेतील संस्थेच्या खात्यावर जमा न करता स्वतःजवळ ठेवून घेतल्याचे लेखा परीक्षणात उघड झाले आहे. ही रक्कम सव्याज बँकेतील खात्यात भरणा करण्यासंदर्भात परझने याला दि. १६ ऑगस्ट २०१८ रोजी नोटीस पाठविण्यात आली. परंतु, त्यावर परझने याने असमाधानकारक खुलासा दिला. एवढेच नव्हे तर परझने याने सदरील संपूर्ण रकमेची बनावट रोजकीर्द केल्याचेही समोर आले आहे. तसेच, खालापुरी येथील डीसीसी बँकेत भरणा केलेले ४० हजारांचे चलनही बोगस आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे लेखा परीक्षक काझी हते शामुद्दिन नवाबुद्दिन यांनी परझने याच्याविरोधात शिरूर का. पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सदर फिर्यादीवरून मारोती परझने याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक टाक हे करत आहेत.