Breaking News

पर्यावरणमंत्र्याकडून छापा टाकत पॅकेजिंग कंपनीवर कारवाई


पुणे : चाकण येथील औद्योगिक वसाहतीतील आगरवाल पॅकेजिंग कंपनीवर खुद्द पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी छापा टाकून धडक कारवाई केली. पर्यावरण मंत्री कदम हे चाकण-तळेगावमार्गे उद्धव ठाकरे नियोजनासाठी शिर्डी येथे जात होते. या वेळी खराबवाडी गावच्या हद्दीत एक टेम्पो प्लॅस्टिक घेऊन पुढे जाताना त्यांना दिसला. त्यांनी टेम्पोचालकाला विचारले असता हा माल एका कंपनीतून आणला असून, तो दुसर्‍या कंपनीत नेत असल्याचे सांगितले. यानंतर कदम यांनी पोलिसांना पाचारण केले. चालकाकडे असलेल्या कागदपत्रांवरून कंपन्यांचे पत्ते मिळाले. या पत्त्यावर कदम यांनी आपला ताफा वळविला. टेम्पोच्या मागे कंपनीत जाऊन आगरवाल पॅकेजिंग प्रा. लि. या कंपनीवर छापा मारून थेट कारवाई केली. येथे प्लॅस्टिक उत्पादन होत असल्याचे त्यांना आढळले. या कंपनीत कच्चा व पक्का असा अंदाजे चार मोठी गोदामे भरून कोट्यवधीचा माल आढळला. कंपनीचे अधिकारी हे उत्पादन 50 मायक्रॉनच्या पुढे आहे व त्यावर बंदी नसल्याचे सांगत होते. कदम यांनी काही अधिकार्‍यांना चिंबळी फाटा येथील मिताली पॅकेजिंग कंपनीत पाठवून तेथेही कारवाई केली. कदम 4 तास कारवाई होईपर्यंत कंपनीत उपस्थित होते.