Breaking News

कामात हलगर्जीपणा; वाई तालुक्यातील बीएलओवर गुन्हा दाखल

सातारा, दि. 8 (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचे संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या अनुषंगाने दि. 7 ऑक्टोबर रोजी विशेष मोहिम राबविली होती. विशेष मोहिमेंतर्गत तहसीलदार वाई यांनी तालुक्यातील उडतारे येथील मतदान केंद्र क्रमांक 291 या ठिकाणी भेट दिली. रेखा बाबर केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) गैरहजर असल्याचे आढळून आले. तसेच त्यांचे आजपर्यंतचे मतदार नोंदणीचे काम असमाधानकारक असल्याचे निदर्शन आल्याने त्यांच्यावर भुईंज पोलीस ठाण्यात लोकप्रतीनिधीत्व अधिनियम 1950 कलम 32 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. केंद्रस्तरीय अधिकार्‍यांनी मतदान केंद्रावर हजर राहून नमुना नंबर 6 नाव वाढविणे, नमुना 7 नावाची वगळणी करणे, नमुना 8 तपशिलातील दुरुस्ती, 8 अ स्थलांतर करणे याबाबत फार्म स्वीकारण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या सूचनेनुसार वाईचे तहसीलदारांनी तालुक्यातील मतदान केंद्राला भेटी दिल्या. वाई तालुक्यातील उडतारे येथील मतदान केंद्र क्रमांक 291 या ठिकाणी भेट दिली असता केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) रेखा आनंदराव बाबर गैरहजर असल्याचे आढळून आले. तसेच त्यांचे मतदान नोंदणीचे काम असमाधानकारक असल्याने त्यांच्या विरोधात भुईंज पोलीस ठाण्यात लोकप्रतीनिधीत्व अधिनियम 1950 कलम 32 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.