Breaking News

गोदावरी नदीपात्रातील बंधार्‍यात पाणी सोडा -अमरसिंह पंडित


गेवराई,(प्रतिनिधी) ः- तालुक्यात गंभीर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्‍न गंभीर झाला आहे. दुष्काळाची दाहकता ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढत आहे. गोदावरी नदीकाठच्या शेतकर्‍यांना दिलासा मिळावा, या भागातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटावा यासाठी जायकवाडी धरणातून नदीपात्रातील बंधारे आणि बॅरेजमध्ये पाणी सोडण्याची आग्रही मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी केली आहे. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना त्यांनी या बाबत लेखी पत्र दिले आहे.

यावर्षी पावसाने मोठ्या प्रमाणावर उघडीप दिल्यामुळे भुजल पातळीत मोठी घट झालेली आहे. खरीपाची पिके शेतकर्‍यांच्या हातून गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. शासनाकडून या बाबत कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. सत्ताधारी मंडळी दुष्काळी परिस्थितीतही राजकारण करण्यात आणि विरोधकांवर टिका करण्यात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी शेतकर्‍यांना दिलासा मिळावा या दृष्टीने गोदावरी नदीपात्रातील बंधार्‍यांमध्ये जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. यापूर्वी त्यांनी केलेल्या मागणीमुळे उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले होते. जालना आणि बीड जिल्ह्याच्या हद्दीवर गोदावरी नदीपात्रात आपेगाव, हिरडपूरी, शहागड, गोंदी, जोगलादेवी, मंगरुळ, शिवनगाव, ढालेगाव, लोणीसांगवी यांसह अनेक ठिकाणी बंधारे आणि बॅरेज यांचे काम आघाडी सरकारच्या काळात पूर्ण झालेले आहे. अल्प पर्जन्यामुळे यावर्षी गोदावरी नदी पूर्ण क्षमतेने वाहिली नाही. त्यामुळे या बंधार्‍यात पाणी साठवण झालेले नाही. बंधार्‍याच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्‍न असल्यामुळे जायकवाडीच्या लाभक्षेत्रातील विशेषतः गोदावरी पट्ट्यातील ग्रामस्थांनी नदीपात्रातील बंधार्‍यांमध्ये पाणी सोडण्याची आग्रही मागणी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी या भागातील शेतकर्‍यांच्या भावना लेखी पत्राद्वारे राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांकडे मांडलेल्या आहेत. शेतकर्‍यांमधील शासन विरोधी असंतोष त्यांनी सरकारकडे व्यक्त केला असून तातडीने पाणी सोडण्याची कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिलेला आहे.