Breaking News

उदयनराजे भाजपच्या वाटेवर ? मुंडे, महाजन आणि मुख्यमंत्र्यांची घेतली भेट


मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुंबईत भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्या. भोसले यांनी पंकजा मुंडे, गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. उदयनराजे लोकसभेची जागा भाजपच्या तिकीटावर लढविणार आहेत. ते भाजपमध्ये दाखल होणार आहेत, अशा उलटसुलट चर्चा सुरू आहेत. नंतर मतदारसंघातील कामांबाबत उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असे सांगण्यात आले. उदयनराजे यांनी सुरुवातीला मराठा आरक्षणाबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर राज्यातील इतर काही प्रश्‍नांवर ते बोलले असल्याचे समजते. उदयनराजे यांनी पंकजा मुंडे यांचीही भेट घेतली. त्यात त्यांनी अनेक इतर प्रश्‍न आणि राजकीय प्रश्‍नांवर चर्चा केली. आपल्या मतदारसंघातील काही कामांबाबत त्यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येते. पुन्हा उदयनराजे यांनी आपला मोर्चा गिरीश महाजन यांच्याकडे वळविला असून, दोघांमध्ये बैठक अद्याप सुरू आहे.

उदयनराजे हे सातार्‍याचे राष्ट्रवादीचे खासदार असले तरी शरद पवार यांचा अपवाद सोडला तर ते अन्य कुठल्याही नेत्याला फारसे जुमानत नाहीत. सातारा जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांचं आणि त्यांचंही फारसं पटत नाही. राष्ट्रवादीच्या पक्षबांधणीतही ते फारसे सक्रिय नसतात असाही त्यांच्यावर आरोप होतो. त्यामुळं यावेळी त्यांना तिकीट मिळणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातार्‍यात बैठक घेऊन मतदार संघाचा आढावा घेतला होता. त्या बैठकीलाही राजे उपस्थित राहिले नाहीत. या बैठकीत पक्षाच्या अन्य नेत्यांनी उदयनराजे यांच्याविरोधात तक्रारी केल्या. पक्षाला त्यांचा काहीच उपयोग होत नसेल तर मग तिकीट तरी कशाला देता असा सवाल स्थानिक नेत्यांनी पवारांना केला. उदयनराजे हे कुठल्याही पक्षात असले तरी त्यांची कामाची स्वतंत्र स्टाईल आहे. आणि त्यांना मानणार्‍यांचा एक मोठा वर्ग सातारा जिल्ह्यात आहे. त्यामुळं त्याचं एक स्वतंत्र संस्थानच आहे असं मानलं जातं. शरद पवार घेतील तो निर्णय मान्य असेल असं उदयनराजेंनी म्हटलं होत.