Breaking News

उदयनराजे कोणालाही भीत नाहीत : ना. चंद्रकांत पाटील


सातारा (प्रतिनिधी) : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची खासदार उदयनराजे भोसले यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेवून चर्चा केली. खासदार भोसले यांच्या लोकसभेच्या उमेदवारीवरुन सध्या सातारा जिल्ह्यात धुरळा उठला आहे. ते पक्षातून निवडणूक लढवणार आहेत याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरु आहे. 

दरम्यान, त्यांनी महसूलमंत्र्यांची आज सकाळीच घेतलेली भेट ही महत्वाची मानली जात आहे. दरम्यान, चंद्रकांतदादांनी राजे कुणाला भीत नाहीत, सर्वांना खिशात घेवून फिरतात अशी टिपणी केल्याने त्यांच्या भेटीला महत्व आले आहे

उदयनराजे गेली दोन टर्म सातारा लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत, त्यांची स्टाईलच वेगळी असल्याने ते लोकप्रिय आहेत. येणार्‍या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उमेदवाराने संदर्भाने जिल्ह्यात सध्या जोरदार चर्चा आहे. ते जरी राष्ट्रवादी कॉंगे्रसचे खासदार असले तरी, त्यांच्या यावेळच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतीलच काही आमदारांचा विरोध असल्याचे बोलले जाते. दरम्यान, दोनच आठवड्यापूर्वी मंत्रालयात जावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे सध्या त्याची चर्चा सुरु आहे. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील कार्यक्रमासाठी येथील शासकीय विश्रामगृहात काल रात्रीच मुक्कामी आले होते. सकाळी सकाळीच उदयनराजेंनी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेवून चर्चा केली. राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सुनील काटकर, मनोज घोरपडे यावेळी उपस्थित होते.
भेटीनंतर बाहेर पडताना चंद्रकांतदादांनी राजे कुणाला भीत नाहीत, ते सर्वांना खिशात घेवून फिरतात अशी मिश्किल टिपणी केल्याने त्यांची भेट ही राजकीय वर्तुळात महत्वाची मानली जात आहे.

दरम्यान, उदयनराजेंनी सोमवारी येथील विश्रामगृहावर कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे व शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा केली. विश्रामगृहावर झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेला उधाण आले आहे.