Breaking News

पुणे-नाशिक महामार्गावर वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू


संगमनेर/प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील पुणे- नाशिक महामार्गावर चंदनापुरी शिवारात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, काल रविवार दि. 21 रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान चंदनापुरी घाट ते चंदनापुरी दिशेने भरधाव वेगाने जाणार्‍या मोटारसायकल क्रमांक एम. एच 17 सी. ए 7968 हिने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या भास्कर राजू राहणे (वय- 55) यांना जोराची धडक दिली. या धडकेत त्यांना डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथे पुढील उपचरार्थ नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. 

याबाबत शांताराम राहणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटारसायकल चालकाविरुध्द 304 (अ), 279, 337,338 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दुसरा अपघात पुणे- नाशिक महामार्गावर चंदनापुरी शिवारातील आनंदवाडी येथे घडला. काल रात्री 11 वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दिलीप सयाजी राहणे (वय-45)- यांचा मृत्यू झाला. आनंदवाडी ते चंदनापुरी दिशेने मोटारसायकल वरून जात असताना रास्ता ओलांडताना चंदनापुरी घाटाकडून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाची धडक बसल्याने झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दोनही घटनांमुळे चंदनापुरी गावावर शोककळा पसरली आहे.