सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे तालुका अधिवेशन उत्साहात


 चिखली,(प्रतिनिधी): सीटू प्रणित महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे चिखली तालुका अधिवेशन शनिवार 20 ऑक्टोबर रोजी चिखली तालुक्यातील जांभोरा येथे उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनाला जिल्हाभरातून आलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आगामी आंदोलनांची दिशा या अधिवेशनात सर्वांशी चर्चा करून ठरविण्यात आली. 

जांभोरा येथील वेल्लोजी महाराज मठामध्ये तयार करण्यात आलेल्या कॉम्रेड अहिल्याताई रांगणेकर नगरात घेण्यात आलेल्या या अधिवेशनाला संघटनेच्या जिल्हासचिव सरला मिश्रा, जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड, अंजली गायकवाड, पार्वती पाटील, माया डिवरे, मंदा डोंगरदिवे यांच्यासह जिल्हा कमेटी सदस्य उपस्थित होते. अधिवेशनात सर्वप्रथम सीटूच्या लाल झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत चिखली तालुका कमेटीच्या वतीने करण्यात आले. त्यानंतर अधिवेशनाचे प्रास्ताविक अ‍ॅड. विद्या बडुटकर यांनी केले. या वेळी अंगणवाडी सेविका व मदतनिसांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी गेल्या तीन वर्षांतील संघटनात्मक बांधणी व संघटनेच्या झेंड्याखाली करण्यात आलेल्या विविध आंदोलनांचा लेखाजोखा मांडला. तसेच आगामी काळात एकात्मिक बालविकास योजनेला आणखी व्यापक करणे व त्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनिसांसमोर असलेल्या आव्हानांसाठी करावयाच्या आंदोलनांची माहिती दिली. केंद्रातील मोदी सरकार व्दारा एकात्मिक बालविकास योजनेमध्य करीत असलेल्याआर्थिक कपातीमुळे ही योजना खासगीकरणाकडे नेण्याचा त्यांचा घाट दिसत असून, समायोजनाच्या माध्यमातून अंगणवाड्या मोठ्या प्रमाणात बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून भविष्यात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनिसांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळू शकते. लाभार्थ्यांच्या आधार लिकिंगमुळे पोषण आहाराचा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने पोषण आहारावर गदा येण्याची शक्यता आहे. या प्रकाराविरोधात अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी संघटितपणे आंदोलन करावे, कारण नुकतीच केंद्र सरकारने केलेली 1500 रुपये सेविका व 750 रुपये मदतनिसांची झालेली मानधनवाढ हे 5 सप्टेंबरच्या सीटूच्या लढ्याचे यश आहे, असे ते म्हणाले. या प्रसंगी वैशाली चाहकर, प्रतिभा वक्ते, जयश्री क्षीरसागर, सविता चोपडे, सरला मिश्रा, अनिता चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संगठना मजबूतीसाठी अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी एकजूट होण्याचे आवाहन केले. अधिवेशनाचे सूत्रसंचालन विजया राऊत यांनी केले. अ‍ॅड. विद्या बडूटकरने सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी संगीता मादनकर, सुनंदा मोरे, ऊर्मिला खेडेकर, अनिता चव्हाण, पुष्पा शिंगणे, सीमा बोर्डे, संगीता वायाळ, संगीता बोर्डे, इंदू मोरे, गीता मोरे, मंगला ठेंग, कमल वानखेडे, सुनंदा मोरे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget