Breaking News

काश्मीरमध्ये फुटिरतावाद्यांनी पुकारला बंद


श्रीनगर : फुटिरतावाद्यांनी सोमवारी पुकारलेल्या बंदमुळे काश्मीर खोर्‍यात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. कुलगाममध्ये झालेल्या स्फोटात 7 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे. दुकाने, खासगी कार्यालये, पेट्रोल पंपासह व्यापारी प्रतिष्ठाने आज बंद आहेत. या परिसरात सार्वजनिक वाहतूक बंद असली तरी खासगी वाहनांची ये-जा सुरू आहे. या बंदमुळे सरकारी कार्यालये आणि बँकामध्ये कर्मचारी कमी संख्येने उपस्थित आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुलगाम जिल्ह्याच्या लारो परिसरात रविवारी झालेल्या चकमकीत 3 अतिरेक्यांना सुरक्षा यंत्रणांनी कंठस्नान घातले होते. या चकमकीत 7 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ फुटिरतावादी नेते सईद अली शाह गिलानी, मिरवेझ उमर फारुख आणि मोहम्मद यासिन मलिक यांनी ’जॉईंट रेसिंस्टन्स लिडरशिप’ च्या नेतृत्वाखाली हा बंद पुकारला आहे. या बंदला ’काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’, काश्मीरी पंडित संघटना, काश्मीरी पंडित संघर्ष समिती आणि ’ऑल इंडिया ऑटो-रिक्शा ड्रायवर असोसिएशन’ने पाठिंबा दर्शवला आहे. जम्मू काश्मीर प्राथमिक शिक्षण मंडळ आणि इस्लामिक विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने आज होणार्‍या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.