Breaking News

जातीवाचक शब्द वापरल्यामुळे अमरापूर बंद

शेवगाव ( प्रतिनिधी )
एका समाजास जातीयवाचक अपशब्द वापरणार्‍या ग्रामपंचायत सदस्याच्या निषेधार्थ अमरापूर बंद ठेऊन संतप्त ग्रामस्थाने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. अमरापूर येथील एका ग्रामपंचायत सदस्याने रविवार दि. 21 रोजी सांयकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान मद्यधुंद अवस्थेत पानटपरी चालकाशी हुज्जत घातली यातच त्याने एका समाजाबाबत मोठमोठयाने जातीयवाचक अपशब्द वापरल्याने संतप्त झालेले ग्रामस्थ त्याच्या भोवती जमा झाले पंरतु त्याच्या नातेवाईकांनी सदर सदस्यास घरी ओढत नेले तरीही काही युवक त्यास जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी जाण्याच्या तयारीत होते मात्र गावातील सुज्ञ मंडळीनी यास प्रतिबंध घातल्याने पुढील अनर्थ टळला.

दरम्यान सोमवार दि. 22 रोजी याच्या निषेधार्थ अमरापूरचे व्यवहार बंद ठेवण्यात आले सकाळीच बसस्थानक चौकात मोठा जमाव जमा झाला ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्यासह ग्रामस्थांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला. याची माहिती पोलीसांना कळताच पोलीस उपनिरीक्षक भरत काळे पो.कॉ. राजु चव्हाण, संतोष धोत्रे, संदिप दरोडे हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी दोन समाजात तेढ निर्मान करण्याचा हा प्रयत्न असुन या ग्रामपंचायत सदस्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली ही कारवाई करण्याचे आश्‍वासन पो. उपनिरीक्षक काळे यांनी दिल्याने चार तासानंतर व्यवहार सुरळीत करण्यात आले