Breaking News

भाजपची झोप उडवणारा सर्व्हे


देशात आगामी लोकसभा निवडणूकांचे वातावरण बघायला मिळत असतांनाच राज्यातील विधानसभा निवडणूका झाल्यास काय चित्र असेल? याचा अंदाज घेण्यासाठी भाजपच्या धुरीणांनी नुकताच एक सर्व्हे घेतला. यात राज्यातील भाजपच्या 6 खासदार आणि 45 आमदारांचे पुन्हा निवडून येण्याचे स्वप्न भंगणार आहे. दिल्लीतील चाणक्य नावाच्या संस्थेकडून भाजपाने हा सर्व्हे करून घेतला. मात्र या सर्व्हेतून भाजप आमदारांची खालावणारी कामगिरी समोर येत असून, त्यामुळे पुन्हा निवडणूका झाल्यास भाजपाला पुन्हा राज्यात निवडून येणे अशक्य असल्याचे चित्र या सर्व्हेतुन मांडण्यात आले आहे. चाणक्य या संस्थेने भाजपाच्या खासदार आणि आमदार मतदारसंघात पाहणी करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्या आधारे प्रत्येक आमदार आणि खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आले आहे. 

राज्यातच नव्हे तर देशभरात भाजप आमदार व खासदारांच्या विरोधात सर्वसामान्यांची नाराजीची धार तीव्र होतांना दिसून येत आहे. भाजपाच्या नेत्यांचा मतदारसंघात होत नसलेला जनसंपर्क, निर्णय घेण्यात होणारा विलंब, सर्वसामान्य कार्यकर्ते, जनतेची कामे होतांना दिसून येत नाही. राज्य व केंद्र स्तरावर नेतृत्वाकडून जनतेच्या सोयीचे निर्णय घेतले जात नाही. पेट्रोल-डिझेल आणि दरवाढीवर कोणतेही नियत्रंण नाहीत. राज्य आणि केंद्र सरकारने जरी पाच रूपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला असला तरी हा आनंद जास्त दिवस टिकु शकला नाही. कारण राज्य आणि केंद्र सरकारने पाच रूपये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, देखील दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमती सातत्याने वाढत चालल्या आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. मूलभूत सोयी-सुविधा महाग होत आहे. त्यामुळे भाजपाच्या विरोधात सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली असून, त्याला विरोधकाची ताकद मिळतांना दिसून येत आहे. गेल्या चार वर्षांतील विरोधकांचे चित्र आणि आताची विरोधकांची ताकद यात तफावत असून, विरोधकांची ताकद वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे भाजपला होणारा विरोध तीव्र होतांना दिसून येत आहे. राज्यावर कर्जांचा डोंगर उभा राहीला आहे. राज्य कसे चालवायचे हा यक्षप्रश्‍न फडणवीस सरकार समोर निर्माण झाला आहे. राज्य कर्मचार्‍यांचा सातवा वेतन आयोगाचा तिढा, त्यांनतर राज्यावर पडणारा आर्थिक बोझा, राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकर्‍यांची दयनीय स्थिती, या संपूर्ण परिस्थितीमध्ये बदल करण्यात भाजप सरकारला अपयश आले आहे. भाजपबरोबरच शिवसेनेला देखील निवडणूका झाल्यास मोठा फटका बसू शकतो. शिवसेनेने नेहमीच सत्तेत राहून आव्हानाची भाषा कायम ठेवली असली, तरी ही आव्हानांच्या भाषेची खिल्ली अनेकवेळेस उडवली आहे. त्यामुळे सेना सत्तेतून बाहेर कधी पडणार असा सवाल विचारण्यात येत असला, तरी चार वर्ष झाले तरी सेना भाजपसोबत सत्तेत सहभागी आहे. भाजपवर जनता नाराज आहेत, त्याचबरोबर भाजपसोबत शिवसेना असल्यामुळे येणार्‍या निवडणूकांत दोघांना मोठा फटका बसणार यात शंक नाही. तसेच मंत्रीमंडळाचा विस्तार या शनिवारी आयोजित करण्याची शक्यता आहे. यात अनेक मंत्र्यांना डच्चू देऊन नवीन मंत्र्यांना स्थान देण्यावर भाजप नेतृत्वाचा भर असला तरी, त्यातून येणार्‍या काही दिवसांत भाजपची कामगिरी सुधारेल, अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे भाजपने केलेला सर्व्हे हा त्यांची झोप उडवणारा आहे. यातून भाजप नेतृत्व व आमदार धडा घेतील, अशी कोणतीही शक्यता सध्यातरी दिसून येत नाही.