Breaking News

ग्रामीण भागातील मुलींना बारावीपर्यंत बस मोफत प्रवासाची केवळ घोषणा न करता अंमलबजावणी करा -एसएफआय


बीड,(प्रतिनिधी): ग्रामीण भागातील मुलींना पाचवी ते बारावी पर्यंत मोफत बस पासची योजना सुरु करावी यासाठी एसएफआय ने अनेक वर्षापासून सतत संघर्ष केला होता त्या आंदोलनाला खर्‍या अर्थाने यश आले आहे. त्यामुळे संघटनेच्या वतीने आम्ही राज्य सरकारचे अभिनंदन करतो परंतु राज्य सरकारच्या वतीने दि २५ सप्टेंबर रोजी इयत्ता बारावी पर्यंत मोफत प्रवास सवलत पास देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे असे सांगण्यात आले परंतु घोषणा करून आज दहा दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रातील जिल्हा परिवहन विभागात आजतागायत पर्यंत कुठलाच शासन निर्णय मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी लातूर जिल्ह्यातील स्वाती पिटले हिने पाससाठी पैसे नसल्यामुळे आत्महत्या केली होती. त्यानंतर मराठवाड्यातील विद्यार्थिनींना एसटीचा मोफत पास देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता अन ‘स्वाती अभय योजना’ असे मोफत पास योजनेला नाव देण्यात आले होते.परंतु काही दिवसानंतर या योजनेचे तीन तेरा वाजवण्यात आले आणि या योजनेला मृत स्वरूप देण्यास प्रशासनाला यश आले आहे.हे उदाहरण ताजे असतानाच आता अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने बस पास योजना सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सध्या ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एसटीने मोफत प्रवास सवलत लागू आहे.ही सवलत आता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनींकरीता राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे ही सवलत शंभर टक्के इतकी आहे .या योजनेत दहावी पर्यंत एकोणवीस लाख चौपन्न हजार विद्यार्थीनी तसेच बारावी पर्यंत चोवीस लाख विद्यार्थीनी लाभ घेणार आहेत.परंतु पुर्वीच्या योजनेचा अनुभव पाहता बस पास काढण्यासाठी अनेक अडचणीना सामोरे जावे लागते जसे कि जिल्ह्यातील आणि तालुक्यातील काही आगारात नावालाच स्वतंत्र खिडकी आहे.अन त्याठिकाणी परिवहन विभागाचे दुसरेच काम करण्यात येते तसे न करता केवळ बस पास साठीच ती स्वतंत्र खिडकी योजना राबवावी.राज्यातील दुर्गम भागात शाळा आणि कॉलेज भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेतच बसेस सोडण्यात याव्यात.